ठाणे : 'प्रेम करावे तर कोणावर करावे; शिवाजी महाराजांच्या विचारांवर; गडकिल्ल्यांवर करावे' असा संदेश देत आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांना 'शिवनेरी' किल्ल्याची सफर घडविण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या पबजी आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करून शिवजयंतीच्या एक आठवडा आधीच शिवनेरीवर भगवा ध्वज फडकावण्यात आला.
कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शैक्षणिक सहलींना ब्रेक लागला होता. त्यातच आज रविवार सुट्टीचा दिवस आणि जगभर व्हॅलेंटाईन डेची धूम सुरू असतानाच आठवडाभरावर आलेल्या शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभेच्यावतीने परिसरातील तीनशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुण्याच्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याची सफर घडवली. ठाण्याच्या लोकमान्यनगर परिसरातून पहाटे विविध बसेसमधून विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले. ठाणे ते पुणे असा बस प्रवास, विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण आदी सोयी उपक्रमात मोफत पुरविण्यात आल्या.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण व सचिव मयूर तळेकर यांनी गेल्या महिनाभरापासून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू केली होती. त्यानुसार विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे, संदीप शेळके, दिपक पोळ, प्रशांत पालव, ऋषिकेश घुले, अमोल मडये, विघ्नेश शेलार यांच्या टीमने आज विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना शिवनेरीवर नेणे, या किल्ल्याची विद्यार्थीवर्गास माहिती देणे अशी व्यवस्था पाहिली.
उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्षगेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे यंदा अधिक मोठ्या प्रमाणात किल्ले सफर मोहीम हाती घेण्यात आली. पुढील वर्षी एका नव्या किल्ल्यावर विद्यार्थ्यांना नेण्यात येईल. त्यावेळी ही संख्या हजारोंच्या घरात असेल अशी माहिती यावेळी उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.