- नारायण जाधवठाणे : महामुंबई क्षेत्रात विविध शहरात १२ मेट्रो मार्गांसाठी आवश्यक असलेल्या विविध कारशेड उभारण्यावरून वाद पेटलेला असताना ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील कारशेड उभारण्याबाबतही एमएमआरडीएला वारंवार बेडूक उड्या माराव्या लागल्या आहेत. ठाण्यातील कावेसर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, भिंवडीतील कोन- गोवे येथील कारशेड उभारण्याचा निर्णय बदलल्यानंतर मुंबईतील दहिसर येथील प्रस्तावित कारशेड आता ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या राई- मुर्धे गावात आणि कोन येथील कारशेड कशेळी गावांत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे स्थानिकांचा विरोध डावलून नगरविकास विभागाने आता मेट्रो मार्ग क्रमांक सात ‘अ’ आणि नऊसाठी भाईंदरच्या राई- मुर्धे आणि मुर्धे येथील ३२ हेक्टर जागा आरक्षित केली आहे.
याबाबतची अधिसूचना १९ सप्टेंबर २०२२ रोजीच प्रसिद्ध केली असून सामान्य नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी नवी मुंबईतील कोकण भवन येथील नगररचना विभागाच्या सहसंचालकांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले आहेत. हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली आहे.
वास्तविक पाहता एमएमआरडीएच्या २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले होते; परंतु, हा निर्णय झाल्यानंतर भाईंदरचे शेतकरी आणि पर्यावरणप्रमींनी तीव्र आक्षेप घेतला होता. तेव्हापासून हा विषय मागे पडला होता; परंतु, आता राज्यात सत्ताबदल होताच भाईंदरच्या राई- मुर्धे आणि मुर्धे येथेच कारशेड बांधण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
सीआरझेड परवानी घेणे बंधनकारकराई- मुर्धे आणि मुर्धे येथील ३२ हेक्टर जागेत १८ मीटर रस्ता आणि रहिवास भाग मोडत असून त्यातील बहुतांश भाग सीआरझेड क्षेत्रात मोडतो. यामुळे ही जागा शासनाने हस्तांतरित केल्यानंतर एमएमआरडीएने सीआरझेड अनुषंगाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथोरिटीसह पर्यावरण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.