लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महापालिका क्षेत्रातील वाढत्या वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला ३३ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या १ व्या वित्त आयोगानुसार मिलियन प्लस सिटी योजनेतून दोन दिवसांत महापालिकेच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी माध्यमांना दिली.
महापालिकेला हा निधी मिळण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. केंद्र सरकारकडून १५व्या वित्त आयोगानुसार महापालिका क्षेत्रातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी निधी दिला जातो. केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र, तो महापालिकेला मिळाला नव्हता. याबाबत खासदार या नात्याने पाटील यांनी २९ जूनला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविले होते. तसेच संबंधित निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची विनंती केली होती. केंद्रीय राज्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी वेगाने निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले.
------------
महापालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मिलियन प्लस सिटी योजनेतून आराखडा तयार केला आहे. त्यात वृक्षारोपण, उद्योगाचे नूतनीकरण, विद्युत वा गॅस शवदाहिनी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिग्नल, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, प्रदूषण रोखण्यासाठी हवा शुद्धिकरण युनिट व हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
..........
वाचली