तलासरी : गडचिरोली जिल्ह्यातील ३३ मुली लॉकडाउनमुळे गुजरातमधील वापी येथील कारखान्यात अडकल्या होत्या. बुधवारी रात्री महामंडळाच्या विशेष बसने त्यांना घरी पाठवण्यात आले. यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केले होते.
भारत सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेतून कौशल्य विकास अंतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण या ३३ मुलींनी नागपूर येथे घेतले. तेथून इंटर्नशिपसाठी त्यांना गुजरात राज्यातील वापी येथील वेल्सपोन कंपनीत पाठवण्यात आले. मात्र, इंटर्नशिप सुरू असतानाच कोरोनामुळे गुजरातमध्येही लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे या मुली वापी येथेच अडकल्या.
थोड्या दिवसांसाठी केलेले हे लॉकडाउन संपल्यावर इंटर्नशिप पूर्ण करू असे त्यांना वाटले. पण लॉकडाउन न संपता ते वाढतच गेले. नंतर मात्र, या मुलींना घराची ओढ लागली. सुरुवातीला त्यांनी आपल्या घरच्यांना फोन करून गडचिरोलीला परत जाण्याचे प्रयत्न करायला सांगितले. त्यांनी तसे केलेही, पण त्यात यश आले नाही. अशा वेळी या मुलींनी खा. सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला आणि या मुलींचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
गुजरातमधील जीआयडीसीचे नोडल आॅफिसर दिनेश परमार यांनी वापीवरून खाजगी बसने या ३३ जणींना बुधवारी संध्याकाळी तलासरी येथे आणले. पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे तसेच पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी एस.टी. महामंडळाच्या दोन बसने त्यांची रात्री नऊ वाजता गडचिरोली येथे रवानगी केली.गुजरातच्या हद्दीवर मुलींना ताब्यात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विशेष बसने गडचिरोली येथे रवाना केले.- स्वाती घोंगडे, तहसीलदार, तलासरी