- सदानंद नाईक उल्हासनगर - महापालिकेने २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीधारकासाठी लागू केलेल्या अभय योजनेतून ३४ कोटींची वसुली झाली. तर फेब्रुवारी अखेर एकून १०८.७० कोटोची वसुली झाली. वर्ष अखेर १२५ कोटी पेक्षा जास्त वसुली होण्याची शक्यता मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत व्यक्त केली आहे.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकीदारासाठी आयुक्त अजीज शेख यांनी २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान अभय योजना सुरू केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेने शहरवासीयांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. अभय योजनेच्या एका आठवड्यात एकून ३४ कोटीचे वसुली झाली असून ३२.३२ कोटी रोख रक्कमेत तर १.९७ कोटी धनादेश व ऑनलाईन भरणाद्वारे वसूल झाले. अभय योजनेच्या जनजागृती साठी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे व मालमत्ता कर विभागच्या उपायुक्त प्रियांका राजपूत, कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी विशेष प्रयत्न केले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी विभागाच्या वसुलीचे १५५ कोटी ठेवले असून फेब्रुवारी अखेर पर्यंत एकून १०८.७० कोटोची वसुली झाली आहे.
महापालिकेने थकबाकीदार मालमत्ता कर व पाणीपट्टी कर मालमत्ताधारकाना अभय योजनेद्वारे सुवर्ण संधी दिली होती. यानंतर सक्तीने मालमत्ता कर वसुली सुरू राहणार असून मोठ्या थकबाकीधारकावर कारवाईची संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे. तर अभय योजनेला एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. अभय योजनेला मुदतवाढ दिल्यास, थकबाकीधारकांना दिलासा मिळून महापालिकेचे वसुली टार्गेट पूर्ण होणार असल्याचेही बोलले जात आहे.