ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघातील उत्तुंग इमारतीमध्ये वास्तव्य करणारे मतदार हाकेच्या अंतरावरील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यास टाळाटाळ करतात व परिणामी मतदानाचा टक्का घसरतो. त्यामुळे आता लब्धप्रतिष्ठितांच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील क्लब हाऊस, पार्किंग लॉट येथे ३४ मतदान केंद्रे उभी केली जाणार आहेत. हे ‘लक्ष्मीपुत्र’ आता तरी मतदान करून लोकशाही बळकट करतील, अशी अपेक्षा आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातील इमारतींमध्ये चार मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये माजीवाडा येथील हॅपी व्हॅली सोसायटीच्या क्लब हाऊस मागील बाजूला रूम नं.२ मध्ये दाेन मतदान केंद्रे आहेत. काॅसमाॅस हेरिटेज साेसायटी, टिकुजीनीवाडी, चितळसर मानपाडा रोड येथेही दाेन मतदान केंद्रे आहेत. मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघातील इमारतींमध्ये आठ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी आनंद विहार गृह संकुल, कळवा पूर्व येथे सहा मतदान केंद्रे आहेत. गजानन सोसायटी विटावा, कळवा पूर्व. येथील इमारतीत दाेन मतदान केंद्रे आहेत.
कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात बारा बंगला येथील गव्हर्नमेंट जिमखाना येथे दाेन मतदान केंद्रे आहेत. उल्हासनगर येथील सोनारा नवजीवन मंडल पंचायत हॉल येथे दाेन मतदान केंद्रे आहेत. योगेश्वर रमा आशिष सोसायटी, महावीर हाईटस, केडीएमसी हाॅल तळमजला, गणेश मंदिर रोड, डोंबिवली पूर्व, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स ‘ए’ विंग वाहनतळ येथे पार्टिशन मतदान केंद्र आहे. कल्याण ग्रामीण विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दहा मतदान केंद्रे इमारतींमध्ये आहेत. त्यापैकी बालाजीनगर ठाकुर्ली स्टेशनजवळ डोंबिवली पूर्व मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स ‘ए’ विंग वाहनतळ या ठिकाणी पाच मतदान केंद्रे आहेत.