सुरेश लोखंडे
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारातील बालकांचे त्यांच्या घराजवळच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहे. यानुसार, जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे. यापैकी पाच हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून १५२ विद्यार्थ्यांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. तर, उर्वरित तब्बल तीन हजार ४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील संबंधित शाळेत गेले नाही. त्यामुळे त्यांनी शालेय प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.
बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते सीनिअर केजी या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील फक्त १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरित तब्बल एक हजार ७५८ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालक अद्यापही शाळेत गेलेले नाहीत. तर, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण, संचारबंदीमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे त्यांच्या निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, या कायद्याखाली प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या पालकांना विविध समस्यांमुळे, बहुतांश शाळांकडून मार्गदर्शन व सहकार्य न झाल्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांना या मोफत शालेय प्रवेशाला मुकावे लागले आहे.
मार्गदर्शनाअभावी पालक गोंधळले
आजपर्यंत केवळ १३४ बालकांचे प्रवेश मिळाल्याचे दिसून येत आले. तर, दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध समस्यांमुळे रद्द झाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या तब्बल एक हजार ७९२ विद्यार्थ्यांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे या बालकांचे शालेय प्रवेश रखडल्याचे उघड झाले आहे. यासाठी जूनमध्ये लॉटरी सोडतद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.
कोरोना संचारबंदीसह शाळांमधील कर्मचाऱ्याची कमतरता, प्रवेशासाठी होणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याच्या कारणाखाली ही प्रवेश प्रक्रिया रखडली. या समस्यांना तोंड दिल्यानंतर असहाय झालेल्या पालकांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच दुसऱ्या शाळेत घेतलेले आहेत. तेथील प्रवेश रद्द करून आरटीईखाली मोफत प्रवेश मिळणाऱ्या शाळेत प्रवेश आता घ्यावा किंवा नाही, ही द्विधा स्थिती पालकांची झाली आहे. याशिवाय मार्गदर्शनाच्या अभावामुळे पालकवर्ग गोंधळलेला आहे.