ठाणे : ऑनलाइन बँक खाते हॅक करून खातेदारांची सुमारे ३५ ते ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या तसेच गावठी कट्टा बाळगणाºया रमेश कावरिया (३२, रा. चेंबूर, मुंबई) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
दिवा-शीळ रोड, दिवा पूर्व भागात एका संशयास्पद व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव आणि सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. जगदेव यांच्या पथकाने २८ मे रोजी रमेश कावरिया याच्याकडून १० हजारांचा गावठी कट्टा हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्यार अधिनियमाखाली गुन्हाही दाखल केला. त्याच्याकडील चौकशीत आॅनलाइन बँक खाते हॅक करून त्याने ३५ लाखांची फसवणूक केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मुंबईतील वनराई आणि तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील सायबर क्राइम पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. तो या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फरार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. काही खातेदारांच्या बँक खात्यातून त्याने चलाखीने ऑनलाइन ३५ ते ४० लाखांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे.अशी केली जायची फसवणूक : मोबाइल किंवा ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांचे, कर्ज किंवा क्रेडिटकार्डसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड जमा करणाºयांच्या मोबाइलचे सीमकार्ड मोबाइलच्या गॅलरीमधून तो मिळवायचा. एखाद्या शुक्रवारी ते कार्ड मिळवल्यानंतर मूळ सीमकार्ड बंद व्हायचे. तोपर्यंत तो या मिळवलेल्या कार्डच्या आधारे त्याच मोबाइलधारकाच्या बँक खात्यातून लीलया आॅनलाइन पैसे वळते करून घेत असल्याचेही त्याने सांगितले. आपले सीमकार्ड बंद पडल्यानंतर आणि अशीच कागदपत्रे बँकेत किंवा क्रेडिटकार्डसाठी दिल्यानंतर सावधानता बाळगा, असे आवाहन पोलीस निरीक्षक होनराव यांनी केले आहे.