ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यात सर्व तालुक्यांत गेल्या २४ तासांत सरासरी ३४.७ मिमी पावसाची नोंद झाली, तर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही ३९ मिमी पाऊस पडला. यादरम्यान उल्हासनगर येथील स्लॅब निखळल्याच्या घटनेव्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना उडली नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले.
कोकणातील अन्य जिल्ह्यांत जोरदारपणे पडणाऱ्या या पावसाचा जिल्ह्यात फारसा जोर दिसून आला नाही. मात्र, पुढील काही दिवस तो जोरदारपणे पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बारवीसह भातसा धरणात २२ मिमी, आंध्रात ३४ मिमी, मोकड सागरमध्ये १९ आणि तानसात १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. या पाणलोट क्षेत्राप्रमाणेच शहरी भागात दिवसभर पाऊस पडला. ठाणे शहर परिसरात सरासरी ३०.४ मिमी, तर कल्याणला ४४.३ मिमी, मुरबाडला २५.७ मिमी, भिवंडीला ४४.५ मिमी, शहापूरला २०.३ मिमी पाऊस पडला. उल्हासनगरला ४२.५ मिमी आणि अंबरनाथला ४१.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.