ठाणे : घोडबंदर भागातील बांधकामांवर कारवाई केल्यानंतर सोमवारी ठाणे महापालिकेने आपला मोर्चा वागळे इस्टेटच्या कामगार रुग्णालयनाका ते ज्ञानेश्वरनगरपर्यंतच्या ३५० बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईमुळे येथील २४ मीटरचा रस्ता आता ३० मीटर होणार आहे.
महापालिकेने पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, शुक्रवार-शनिवारी घोडबंदर भागात १२७ बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर सोमवारी महापालिकेने वागळेपट्ट्यात रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली. या कारवाईसाठी महापालिकेची पथके वागळे इस्टेटमधील कामगारनाक्यावर पोहोचली. या पथकांनी बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू करताच अनेकांनी दुकानांमधील साहित्य इतरत्र हलवण्यास सुरुवात केली. काही जणांनी कामगार रुग्णालय वसाहतीच्या आवारात साहित्य नेऊन ठेवले. साहित्याची वाहतूक करताना अनेकांची दमछाक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, कामगार रु ग्णालयनाका ते ज्ञानेश्वरनगरपर्यंतच्या मार्गावरील ३५० बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने या पथकाने जमीनदोस्त केली. त्यामध्ये २५० व्यावसायिक बांधकामे, तर १०० निवासी बांधकामांचा समावेश आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.कारवाई पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कामगार रुग्णालय रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी येथील रस्ता ३० मीटर रु ंद करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी येथील बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला. ३० मीटर रस्ता रुंद केल्यानंतर त्यालगतच २५० व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातही कोणाचे पुनर्वसन राहिले, तर त्याचे अन्य ठिकाणी ते केले जाईल, अशी हमी यावेळी पालिकेने दिली. १०० निवासी बांधकामांतील कुटुंबांचे भाडेतत्त्वावरील योजनेच्या घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन केले असून त्यांना बीएसयूपीची घरे दिली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.