लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणा विविध पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे आता शहरातील इंजिनिअरिंगच्या तब्बल ३५० उद्योगांनादेखील ऑक्सिजनअभावी अखेरची घरघर लागली आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने यातील बहुसंख्य उद्योग बंद पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातही या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी गावाची वाट धरली आहे. त्यामुळे या उद्योगातील उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ठाण्यातही तशीच परिस्थिती आहे. तो नसल्याने आजही महापालिकेचे पार्किंग प्लाझा कोविड सेंटर सुरू झालेले नाही, तर खासगी रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना आता ठाण्यातील ३५० लघुउद्योगांनादेखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट ही आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जात होती; परंतु मध्यतंरी येथील अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत .त्यात आता काही उद्योग शिल्लक राहिले आहेत, त्यांनादेखील कोरोनामुळे घरघर लागली आहे. त्यातही येथे असलेल्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजला देखील आता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. किंबहुना त्यांचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. त्यामुळे येथील बहुतेक उद्योग बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या उद्योगात आजच्या घडीला लाखो कामगार काम करीत आहेत. परंतु, ऑक्सिजनचा अभाव असल्याने काम थांबले असल्याने येथील कामगारांनी आता गावची वाट धरल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
या ठिकाणी अशा काही कंपन्या आहेत, ज्यांना दिवसाला दोन ते तीन गॅस सिलिंडर लागतात, तर काहींना १० ते १५ सिलिंडरदेखील लागतात. परंतु, आता ज्यांच्याकडे शिल्लक ऑक्सिजन सिलिंडर आहेत, ते वापरणेदेखील थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार आता ऑक्सिजन वापरता येत नसल्याने कामही थांबल्याची माहिती येथील उद्योजकांनी दिली.
-मेडिकल व इंडस्ट्रिअल ऑक्सिजनमध्ये फरक
वास्तविक पाहता इंडस्ट्रिअल आणि मेडिकल ऑक्सिजनमध्ये जमीन - अस्मानचा फरक आहे. इंडस्ट्रिअल ऑक्सिजनचा प्रेशर जास्तीचा असतो, तर मेडिकल ऑक्सिजनचा प्रेशर स्लो असतो. इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजसाठी तयार होणारा ऑक्सिजनचा शासनाकडून मेडिकलसाठी वापर होत आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु, हा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे आता ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने येथील उद्योगांचे कामही थांबले आहे. त्यामुळे काहींनी तर उद्योगच बंद केले आहेत. ते आता पुन्हा सुरू होतील की नाही? याबाबतही शंका असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
.......
आधीच आमच्या इंडस्ट्रीजला घरघर लागली आहे. त्यात आता ऑक्सिजनचा पुरवठादेखील थांबल्याने आमचे उद्योगच बंद पडले आहेत. त्यात कामगार वर्गही लॉकडाऊनच्या भीतीने गावी निघून गेला आहे. तो परत येईल की नाही, याबातही शंका आहे. त्यामुळे आता कदाचित आहे ते उद्योगदेखील कायमचे बंद पडतील.
(ए. वाय. अकोलावाला - ठाणे व्यापार उद्योग महासंघ - मानद सहसचिव)