लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधील ३५२ गावे व पाडे कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४२४ रुग्ण उपचाराखाली आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून ५० ठिकाणी कंटेनमेंट झोन लागू केले आहेत. याशिवाय, तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे आता नुकतेच १३ हजार ९७९ कुटुंबांतील तब्बल ६३ हजार ८३९ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्वेक्षणातील यात बहुतांश ग्रामस्थांना कोणतेही मोठे आजार आढळलेले नाहीत. काही जणांना किरकोळ आजाराच्या सहव्याधी आढळल्या असून, कोरोनाच्या उपचारानंतर त्यांच्या अन्यही व्याधींवर उपचार करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत आहे. आता संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या नियंत्रणात सहा हजार ६४५ कुटुंबांतील तीन लाख सहा हजार ६४१ जणांचे या आधी सर्वेक्षण करण्यात आले होते.
जिल्ह्यात आता ३५२ गावे सध्या कोरोनामुक्त आहेत. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी ग्रामीण गाव, खेडे सज्ज झाले आहेत. सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात १२५ पथके ठिकठिकाणी कार्यरत केली आहेत. जिल्ह्यात रविवारी ५ लाख ४८ हजार १०० रुग्ण आहे. यापैकी ग्रामीण भागात ४० हजार ६३६ रुग्णांची नोंद झाली आहे.
----------