ठाणे : लोकसभेची आचारसंहिता असतानाही वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक घेऊन त्यामध्ये मेट्रो-४ प्रकल्प, रस्ते रुंदीकरण व सात खाजगी विकासकांच्या गृहनिर्माण व एक पार्किंग प्रकल्पातील एकूण ३५२७ वृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या वृक्षांना वाचवण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियान आणि म्युस संस्थेने शनिवारी अनोखे आंदोलन केले. यावेळी वृक्षतोडीला जबाबदार असणाऱ्यांचे फलक हातात घेऊन रस्त्यावर दोन प्रेते ठेवण्यात येऊन या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी संजीव साने, रोहित जोशी, उन्मेष बागवे, संजय गोपाळ (समता विचार प्रसारक संस्था), धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, नितीन देशपांडे, विनोद मोरे, नरेंद्र पारकर, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, लोकराज संघटनेचे तृप्ती व मेधज, जागचे प्रदीप इंदुलकर, ठाणे नागरी प्रतिष्ठानचे अनिल शालिग्राम, सुनीती मोकाशी, चेतना दीक्षित आदींसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच ठाणे महापालिकेने या वृक्षतोडीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यानंतर, आता दक्ष नागरिक या निर्णयाविरोधात एकवटले असून त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन शनिवारी झाले. यावेळी काही महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. यामध्ये वृक्षबचावासाठी मेट्रो-४ हा प्रकल्प अंडरग्राउंड करा, ठाण्याचे हरित छप्पर (ग्रीन कव्हर) उद्ध्वस्त करू नका, वृक्ष प्राधिकरण समितीच्या २२ मेच्या बैठकीतील सर्व निर्णय रद्द करा, नागरिकांनी पालिकेच्या व वृक्ष प्राधिकरण समितीच्या प्रस्तावावर ज्या लिखित हरकती व सूचना हजारोंच्या संख्येने दिल्या आहेत, त्यापैकी एकाचीही सुनावणी घेण्यात आलेली नाही, अशी सुनावणी घेणे बंधनकारक करावे. ठाण्याचा विकास पर्यावरण नष्ट न करता करावा. याकरिता महानगरातील सर्व वृक्ष, झाडे, खाडीकिनारे, विहिरी व तळी ही सुरक्षित ठेवावीत, अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन ठाणे महापालिका आयुक्त व एमएमआरडीए आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.