तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायती पैकी ३६ ग्रामपंचायतीचा पाच कार्यकाल संपत आला असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १७ एप्रिल रोजी होणार आहेत. मात्र यावेळी मतमोजणी लगेचच दुस-या दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी असल्याने उमेदवारांना व मतदारांना आपला निवडून आलेला उमेदवार जाणून घेण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.२९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत उमेदवारांनी आपले अर्ज तहसिलदार निवडणूक विभाग कार्यालयात सादर करावयाचे आहेत. ४ एप्रिलला सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर बुधवारी ६ एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यत इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन चिन्हांचे वाटप होणार आहे. रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायं ५.३० वाजेदरम्यान मतदान होणार आहे.तर मतमोजणी लगेचच दुस-या दिवशी १८ एप्रिलला होऊन निवडणूक निकाल घोषित होणार आहे. विक्रमगड तालुक्यातील एकूण ३६ ग्रामपंचायतीसाठी १४३ प्रभागांतून ३९२ उमेदवारांची निवडणूक घ्यावयाची असुन त्यामध्ये अनु जमातीसाठी(महिला)१९५ जागा व इतर सर्वांसाठी १९७ जागांचा समावेश आहे. या निवडणुका विक्रमगड तहसिलदार कार्यलक्षेत्रातील तलवाडा, विक्रमगड या मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये होत आहेत. (वार्ताहर)
३६ ग्रामपंचायतींत रणधुमाळी
By admin | Published: March 21, 2016 1:11 AM