ठाणे - कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यानंतर अखेर प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या ठाणे परिवहनसेवेत केवळ ४०० वाहक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार झाला आहे. परंतु, असे असताना या कंत्राटदाराने ९०० वाहक घेतले आहेत. त्यांच्याकडून गणवेशाच्या नावाखाली प्रत्येकी तीन हजार रु पये घेतले असल्याचा आरोप परिवहन सदस्य संजय भोसले यांनी केला. या माध्यमातून तब्बल ३६ लाख रु पयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सदस्य दशरथ यादव यांनी हा ठेकेदार गणवेशाचे तीन हजार रु पये घेतोच, शिवाय जर एखादा कामगार एक दिवस गैरहजर राहिल्यास त्याच्या वेतनातून एक हजार रु पये वजा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. यावर प्रभारी परिवहन सभापती राजेंद्र महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच प्रत्यक्षात जाऊन याची पाहणी करून त्यात दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.जास्त कामगार कसे?सदस्य दशरथ यादव आणि प्रकाश पायरे यांनी संबंधित ठेकेदाराशी ४०० कामगार घेण्याचा करार केला असताना तो ९०० कामगार कसे घेतो, असा सवाल केला. त्यावर, आपण केवळ ४०० कामगारांचे वेतन अदा करतो, असे उत्तर प्रशासनाने दिले.
गणवेशाच्या नावाखाली ३६ लाखांचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 6:45 AM