मीरारोड - बक्कळ पैसा कमवण्याचे आमिष दाखवून मीरारोडच्या एका व्यक्तीची ३६ लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी सायबर शाखेच्या तपासात सापडलेले वॉलेट हे चिनी नागरिकाच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे . तर सायबर शाखेने १३ महिन्यांच्या तपासा नंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीला त्याचे ३६ लाख रुपये परत मिळवून दिले आहेत .
मीरारोडच्या विनय नगर , जेपी नॉर्थ मध्ये राहणाऱ्या योगेश कांतीलाल जैन यांनी ४ मे २०२२ रोजी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखे कडे तक्रार केली होती . फेब्रुवारी २०२२ मध्ये हॉंगकॉंगच्या भ्रमणध्वनी क्रमांक द्वारे बीटीसी इंडिया ग्रुप १ नावाच्या व्हॉट्स एप ग्रुप मध्ये जैन यांना समाविष्ट करून घेण्यात आले होते . ॲमी नावाच्या ग्रुप एडमिन ने जैन यांच्याशी संपर्क करून बिट कॉईन ट्रेडिंग बद्दल टिप्स देऊन नका कमवण्याचे आमिष दाखवले .
जैन यांनी बिनान्स ऍप डाउनलोड करून ३३ लाख ६५ हजार रुपये खर्च करून ३९ हजार ५९६ यूएस डॉलर खरेदी केले . ते ॲमी ने दिलेल्या लिंक मधून बिट कॉईन ऍप मध्ये भरले . मात्र ऍप चालत नसल्याचे लक्षात आल्यावर जैन यांनी ॲमी कडे चॅटिंग द्वारे विचारणा केली असता तिने उत्तर दिले नाही व नंतर नंबर बंद आला . आपली फसवणूक झाल्याचे जैन यांच्या लक्षात आले.
सायबर शाखेने क्रिप्टो करन्सीचा तांत्रीक तपास सुरु करत तांत्रीक विश्लेषणानंतर व्यवहार थांबविण्यासाठी संबंधीत बिनान्स आणि गेट आयओ या क्रिप्टो करन्सी प्लॅटफॉर्मशी ईमेल द्वारे पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्या कडून क्रिप्टोकरन्सी बॅलेन्स बाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही . क्रिप्टोकरन्सी चे ट्रेसिंगचे सविस्तर विश्लेषणावरून ओकेएक्स या पूर्व आफ्रिकाच्या प्लॅटफॉर्मवरील १ संशयीत वॉलेट निष्पन्न करण्यात आले. संबंधित ओकेएक्स या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजला पत्रव्यवहार केला असता ते संशयित वॉलेट हे एका चिनी नागरिकाच्या नावाने असल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक चौकशी पूर्ण करून सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या अहवालावरून काशीमीरा पोलीस ठाण्यात मार्च २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जैन यांना त्यांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्या साठी न्यायालयमध्ये अर्ज करण्याची माहिती देण्यात आली होती. न्यायालयामध्ये सायबर गुन्हे कक्षाकडून करण्यात आलेला तपास ग्राह्य ठरला. जैन यांची फसवणूक केलेली रक्कम हि चिनी नागरिकाच्या वॉलेट मध्ये जमा झाल्याचे व त्यांना संपर्क करणारे सर्व क्रमांक हे हाँगकाँग देशामधून वापरात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास पोलिसांनी आणून दिले . न्यायालयाने सायबर गुन्हे कक्षाच्या अहवालावरून ओकेएक्स गोठविलेली वॉलेट मधील ३६ लाख हि रक्कम जैन यांना परत करण्याचे आदेश दिले . त्या अनुषंगाने ती रक्कम जैन यांना त्यांच्या खात्यात परत मिळाली आहे .