उल्हासनगर : शहरात दररोज ३७ टन प्लास्टिक कचरा निघत असल्याने, महापालिकेच्या प्लास्टिक बंदीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने वर्षभरात प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या १३९ जणांवर कारवाई करीत ७ लाखाचा दंड वसूल केला. तर २ हजार १९१ किलो प्लस्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली.
उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी महापालिकेने दामदुप्पट किंमतीला कचरा उचलण्याचा ठेका खाजगी कंपनीला दिला आहे. शहरातून दैनंदिन एकून ३६० टन कचरा उचलला जात असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. एकून ३६० टन कचऱ्या पैकी प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण तब्बल ३७ टन असल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ शहरात प्लास्टिक पिशव्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचे उघड झाले. दैनंदिन एकून ३६० टन कचऱ्या पैकी ३७ टन कचरा प्लास्टिक पिशव्याचा असून वेस्टज पेपर २७.२२ टन, काचेचा ७.३४ टन, लेदर व रबर ५.३२ टन, इतर प्लास्टिक पॅकेजिंग कचरा ३.४८ टन, कपडे ४.८३ टन, खराब झालेले अन्न ५०.५४ टन, लाकूड ४.९७ तर इतर कचऱ्याचे प्रमाण १५ टन आहे.
उल्हासनगरात सर्वाधिक प्लास्टिक पिशव्या बनविण्याचे कारखाने असून असे कारखाने चोरून सुरू आहेत. यामध्ये राजकीय पक्षाचे काही नेते, व्यापारी व महापालिका अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. तर पाँकिंग प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या काही कारखान्याला महापालिकेने अटी शर्तीवर परवानगी दिली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. महापालिका आरोग्य विभागाने गेल्या वर्षात १३९ जणांवर प्लास्टिक पिशव्या बाळगल्या प्रकरणी कारवाई करीत, तब्बल ७ लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच २ हजार १९१ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. डम्पिंगच्या आगीच्या धुराने नागरिक हैराण शहरातून दैनंदिन एकून ३६० टन कचऱ्या पैकी २०० टन ओल्या कचऱ्याचे प्रमाण आहे. तर ३७ टन प्लास्टिक पिशव्याचा कचरा असून २७.२२ टन वेस्टज पेपर, कपडे-चिंध्या ४.८३ टन, लाकडी कचरा ४.९७ टन निघत आहे. या कचऱ्यामुळे डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जाते.