लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात १ जून २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या नऊ जणांच्या वारसांना तर, वीज पडून जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना मिळून ३८ लाख ८३ हजारांची मदत देण्यात आली. तर, लहानमोठ्या दुधाळ जनावरांसह ओढकाम करत असलेल्या मोठ्या जनावरांसाठी एक लाख ४० हजारांची मदत दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
यंदा, ठाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारी भागातील घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्यातील शेतपिकांसह जनावरांनादेखील बसला. जिल्ह्यात अनेक जण वीज पडून जखमी झाले. तर, अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्यांना व मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येत असते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर आणि मुरबाड या सात तालुक्यांतील बाधितांचे पंचनामे केले असून त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटपदेखील केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार राजराम तवटे यांनी दिली.
यामध्ये जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान झाले होते. तर, जून ते ऑक्टोबर या काळात वीज पडून व मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवून जिल्ह्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या नातेवाइकांना व वीज पडून जखमी झालेल्यांना ३७ लाख ८३ हजारांची मदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
‘त्या’ शेतकऱ्यांना दीड लाखांची मदतजिल्ह्यात काही पशू व जनावरांचे मृत्यू झाले होते. या मृत पावलेल्या जनावरांसाठीची एक लाख ४० हजारांची मदत संबंधित शेतकऱ्यांंना देण्यात आली.