- अजित मांडके ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी, पालघर या लोकसभा मतदारसंघांत गेल्या १५ निवडणुकांमध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यानुसार, यातील सहाच पक्षांना संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभलेली आहे. त्यात सर्वाधिक १० वेळा भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे खासदार निवडून गेले असून, त्याखालोखाल भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे.ठाणे जिल्ह्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती १९५१ मध्ये झाली असली, तरी त्यानंतर भिवंडी, डहाणू अशा मतदारसंघांत विभागणीसुद्धा झाली होती. तर, १९६२ मध्ये ठाणे आणि भिवंडी असासुद्धा हा मतदारसंघ होता. त्यानंतर, खऱ्या अर्थाने १९७७ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर, २००९ मध्ये ठाणे जिल्ह्याची पुनर्रचना होऊन पालघर, कल्याण आणि भिवंडी अशी लोकसभा मतदारसंघांची विभागणी झाली. त्यात, पालघर हा जिल्हाच वेगळा झाला आहे. हे सर्व मतदारसंघ मिळून नोंदणीकृत ३८ पक्षांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यात, ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसने १० वेळा विजय संपादन केला आहे. याच मतदारसंघातून शिवसेना पाच, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी एक आणि सीपीआयने एकदा, जनता पार्टीनेसुद्धा एकदा विजय मिळवला आहे. पूर्वाश्रमीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसने १० वेळा, तर भारतीय जनता पार्टीने दोन वेळा विजय संपादन केला आहे. २००९ मध्ये ठाणे मतदारसंघाची पुनर्रचना होऊन कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांची निर्मिती झाली. त्यावेळी २००९ आणि २०१४ मध्ये कल्याणमधून शिवसेना विजयी झाली, तर भिवंडीत २००९ मध्ये काँग्रेस आणि २०१४ मध्ये भाजपला विजयी मिळवता आला आहे.१९७७ नंतर कॉँग्रेस नामशेषजिल्ह्यातील तीनही मतदारसंघ हे एकेकाळी कॉँग्रेसचे बालेकिल्ले होते. कॉँग्रेसमध्ये फूट पडूनही या जिल्ह्याने कॉँग्रेसवर विश्वास दाखवला होता. मात्र, १९७७ पासून ठाणे आणि कल्याण मतदारसंघांत कॉँग्रेसची पीछेहाट झालेली आहे. मात्र, २००९ मध्ये भिवंडीत काँग्रेसने विजय मिळवला होता. आता आघाडीच्या जागावाटपातही तीनपैकी ठाणे आणि कल्याण राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. तर, भिवंडी काँग्रेसकडे आला आहे. काँग्रेसचे येथून १० खासदार निवडून गेले आहेत. त्याखालोखाल शिवसेना पाच, भाजप दोन, सीपीआय दोन आणि जनता पार्टी व राष्टÑवादीचा प्रत्येकी एक खासदार संसदेत गेले आहेत. परंतु, काँग्रेसचे अस्तित्व मात्र १९७७ पासून संपुष्टात आले आहे, तर १९८४ मध्ये पुन्हा काँगे्रसने विजय मिळवला होता. त्यानंतर, मात्र या पक्षाचे अस्तित्व संपले.हे लढले पक्ष : तीनही मतदारसंघ मिळून भारतीय राष्टÑीय कॉँग्रेस, समाजवादी पक्ष, भाजप, राष्टÑवादी, शिवसेना, मनसे, आप, भारिप, दूरदर्शी, लोकदल बी, बहुजन समाज, जनता पार्टी, बसपा, जनता दल, एसएमसी, सीपीआय, तिवारी (काँ.), एसजेपीएम, राष्टÑीय समाज पक्ष, नॅपॅपा, अभासे, ईयूयूसी, हिंजपा, प्रारिपा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्टÑीय क्रांतिकारी, क्रांतिकारी जयहिंद सेना, नवभारत निर्माण पार्टी, भारिप बहुजन महासंघ, इंडियन युनियन मुस्लिम लीग, क्रांतिकारी महाराष्टÑ, राष्टÑवादी जनता पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी आदी छोट्यामोठ्या पक्षांनी निवडणूक लढवली होती.
१५ निवडणुकांत लढले ३८ पक्ष; सहा पक्षांच्या खासदारांनी गाठली दिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:35 AM