भिवंडी: भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एकाच दिवसात विविध ठिकाणी १० शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना शहरातील अन्सारनगर, खंडूपाडा, पटेलनगर या परिसरात घडल्या आहेत. कुत्र्यांनी हैदोस घातल्यामुळे शाळकरी मुलांसह पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा यंत्रणेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. मात्र, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे, भिवंडी महानगरपालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहितीदेखील यानिमित्ताने समोर आली आहे.अहमद, माहेनूर खान, अकरम इब्राहिम, हसनैन, रब्बानी, हुजैफा, अय्यब अन्सारी, यश चन्ने आदी शाळकरी मुलांसह १० मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे. हया नामक मुलीच्या चेहऱ्यावर आणि माहेनूरच्या गळ्यावर कुत्रा चावल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या सर्वांवर प्रथम स्व. इंदिरा गांधी स्मृती रु ग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, हया आणि माहेनूर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे आणि मुंबईला हलवण्यात आले आहे. अन्य मुलांवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.एकाच दिवसात १० चिमुरड्यांना कुत्रे चावल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. स्थानिक नगरसेवकाला या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी हात झटकल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. अनेकवेळा तक्रार करूनही पालिका प्रशासनदेखील या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.दरम्यान, शाळकरी मुलांना कुत्रा चावल्याची घटना दुर्दैवी असून यासंदर्भात आपण मनपा आयुक्तांशी चर्चा केली आहे. मात्र, मनपाकडे या मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी यंत्रणाच कार्यरत नसल्याची कबुली आयुक्तांनी दिली आहे. येत्या सात दिवसांत या मोकाट कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी लेखी मागणी आपण मनपा आयुक्तांकडे केली असल्याची माहिती या भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
१० मुलांना कुत्र्यांनी घेतला चावा; भिवंडीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:46 PM