मीरारोड - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात १७ हजार १० इतके मतदार वाढून एकूण मतदारांची संख्या ४ लाख ३९ हजार २८३ हजार इतकी झाली आहे .
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नंतर ठाणे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातील मतदारांची आकडेवारी व निवडणुकीच्या अनुषंगाने उपाययोजना आदींची माहिती निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी दिली . तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील भुताळे यांनी अपर तहसीलदार कार्यालयात येऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला व सूचना केल्या .
मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी नुसार ४ लाख ३९ हजार २८३ मतदार आहेत. त्यात २ लाख ५ हजार ६२५ महिला मतदार तर २ लाख ३३ हजार २८३ पुरुष मतदारांची संख्या आहे . ४ तृतीयपंथी मतदार आहेत. १७ हजार १० मतदार वाढले आहेत . तर विशेष मोहीम राबवून मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांचा आढावा घेऊन आतापर्यंत ७ हजार १०९ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
निवडणुकीसाठी शाळा, सभागृह व मंडप आदी मध्ये ७४ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित केली असून त्यात ४५१ मतदान बूथ असतील . सर्व मतदान बूथ हे तळमजल्यावरच असतील . मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी ५६३ मतदान यंत्रांची मागणी केली आहे. मीरारोडच्या रॉयल कॉलेज मध्ये मतदान यंत्रांचे वाटप, स्वीकृती साठी स्ट्रॉंग रुम तयार केले आहे.
आचारसंहिता चे काटेकोर पालन व्हावे यासाठी ३ स्थायी व ३ भरारी पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. निवडणुकीसाठी प्रचार सभा , प्रचार फेरी , मंडप आदींसाठी परवानगी बंधनकारक असून त्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. वर्ग १ ते वर्ग ४ चे सुमारे ३ हजार ५०० अधिकारी व कर्मचारी निवडणुक कामी तैनात आहेत . दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील वृद्ध मतदारांना घरातूनच मतदान करायचे असल्यास १२ डी हा अर्ज अपर तहसीलदार कार्यालय येथील निवडणूक कार्यालयातुन कर्मचारी घरी येऊन अर्ज भरून नेणार आहेत .