डोंबिवली - ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमाने प्लास्टिक कचरा जमा करण्याच्या मोहीमेला डोंबिवलीसह ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रविवारच्या उपक्रमातून सुमारे 4 टन प्लास्टिक जमा करण्यात आले असून ते व चार ट्रकमधुन रूद्र - जेजुरी येथे पाठविले. सुरुवातीला फक्त डोंबिवली शहरातच सुरू झालेल्या ऊर्जा फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार आता कल्याण, ठाणे या शहरांपर्यंत झाला आहे. पर्यावरणाला अतिशय हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर कमी करणे, वापरलेले प्लास्टिक कच-यात टाकून न देता ते गोळा करून त्यावर पुन:प्रक्रिया करणे अथवा त्याचा पुनर्वापर करणे यासाठी ‘कमी वापर-पुनर्वापर आणि पुनप्रक्रिया या त्रिसूत्रीवर आधारित ‘माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी’ ही मोहीम उभारण्यात संस्था कार्यरत आहे.
शहरातील सोसायट्यांमध्ये, तसेच शाळा, महाविद्यालये आणि इतर निवासी संकुलांमध्ये जाऊन ऊर्जाच्या सदस्या याविषयी जनजागृती करतात व वापरलेले प्लास्टिक कच-यात न टाकता दर महिन्याला गोळा करतात. तसेच अनेक शाळा, महाविद्यालये, अनेक सामाजिक संस्था या प्लास्टिक-त्रिसूत्रीचा प्रचार करून आम्हाला प्लास्टिक जमा करण्यास सहाय्य करतात. या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत असून सध्या दरमहा सुमारे 2 टन प्लास्टिक गोळा केले जाते.
हे प्लास्टिक पुन:प्रक्रिया करून इंधन म्हणून वापरता येण्यासाठी पुणे येथील रुद्र इनव्हॉरमेंटल सोल्युशन्स या संस्थेला पाठवले जाते. रुद्र ही संस्था पर्यावरण स्नेही पद्धतीने इंधन तयार करते. 11 महिन्यातील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. त्यासाठी अनेक संस्था, नागरीक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-मित्र सहभागी झाले. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले. आता आगामी काळात १२ वा प्लास्टीक ड्राइव्ह रविवार १७ डिसेंबर रोजी डोंबिवली व ठाणे येथे असल्याचेही संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.