ठाणे : कोरोनाचा फटका यंदाही विकास निधीला बसला आहे. ठाणे जिल्हा परिषदने यंदा ८५ कोटी ५० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र कोरोनाच्या विविध उपाययोजना व उपचारास प्राधान्य देण्यासाठी शासनाने ४० टक्के निधीला कात्री लावली आहेे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी यावर सदस्यांनी संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही अर्थसंकल्पाच्या ४० टक्के निधी कपातीचे धोरण राज्य शासनाने अवलंबले असून, २४ जून रोजी तसे आदेशही जारी झाल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. सदस्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करीत विकासकामे कशी मार्गी लावणार, असा सवाल प्रशासनास विचारला. मात्र शासनाच्या धोरणानुसार कारवाई करणे बंधनकारक असल्याचे सांगत प्रशासनाने सदस्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
विकासकामांची गरज आणि उत्पन्न लक्षात घेऊन ४० ऐवजी २५ टक्के विकास निधी कपात करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. उपाध्यक्ष सुभाष पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ सदस्य सुभाष घरत, गोकुळ नाईक, कैलास पवार यांच्यासह अन्यही सदस्यांनी निधी कपातीवर नाराजी व्यक्त केली.
---पूरक जोड आहे