मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डंम्पिंग ग्राऊंडवर प्रक्रिया न करताच टाकला गेलेला आणि वर्षानुवर्षे साचून राहीलेल्या ९ लाख ९ हजार ६३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४० कोटी ६६ लाखांचा ठेका पालिकेने दिला आहे . त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या कचऱ्याच्या डोंगरास आग लागून होणाऱ्या सततच्या जाचातून लोकांची सुटका होणार अशी आशा आहे .
मीरा भाईंदर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की , उत्तन डम्पिंग येथे गेल्या अनेक वर्षां पासून साचून राहिलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी पुढाकार घेऊन निविदा प्रसिध्द केली होती.
साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरास सातत्याने आगी लागत असल्याने परिसरात प्रचंड घातक धुराचे प्रदूषण पसरत असते . शिवाय लिचेट मुळे शेतजमीन नापीक झाली आहे . स्थानिकांनी तक्रारी , आंदोलने व आंदोलनाचे इशारे देणे , हरित लवाद व न्यायालयात याचिका करणे आदी पद्धतीने ह्या डम्पिंग चा विरोध चालवला आहे .
डम्पिंग वर उर्वरीत शिल्लक असलेल्या घनकचऱ्याचे मोजमाप हे पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांच्या कडून प्रमाणित करून घेण्यात आले होते . १० ऑगस्ट २०२२ च्या पत्रा नुसार राज्य शासनाने साचलेल्या ९ लाख ९ हजार ६३० मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग साठी ४० कोटी ६६ लाखांच्या खर्चास मान्यता दिली होती .
त्या कामासाठी आता मे. ई.बी. एन्वायरो बायोटेक प्रा. लि. ह्या ठेकेदार कंपनीस कार्यादेश देण्यात आला आहे . या बायोमायनिंग कामास सुरुवात करण्यात आली आहे . सदर कामाची मुदत २१ जून २०२४ पर्यंत असली तरी यंदाचा पावसाळा सुरु होण्यापुर्वी हे काम संपवण्यासाठी आयुक्त यांनी कंत्राटदाराला आदेशित केले आहे.
कंत्राटदार बायोमायनिंग म्हणजे वर्षानुवर्षे साचुन राहीलेला कचरा चाळणी करुन त्यातील खत वेगळे करणे आणि प्लास्टीक मटेरीयल व इतर वस्तु वेगळया करुन त्या प्रक्रियेसाठी पाठविल्या जातील . त्यातील न कुजणारे ज्वलनशिल पदार्थ आरडीएफ या स्वरुपात जवळपासच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये इंधन म्हणुन वापरले जाईल. पावसाळ्यापुर्वी सदर काम पुर्ण झाले तर उत्तन येथील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.