डोंबिवली: पश्चिमेकडील भागात महात्मा गांधी रोडनजीक सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात जेसीबीने मारलेल्या धडकेमुळे पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली. स्कायवॉकखाली ही घटना घडली असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले, पण लाखो लीटर पिण्याचे पाणी वाया गेले. खबरदारी म्हणुन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने काही काळासाठी पुरवठा बंद केला.जेव्हा ही घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकच्याही वरती पाण्याचे फवारे उडाले. तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ कारंजे उडाले होते, त्यामुळे पश्चिमेला जाणारी रस्ता वाहतूक गुप्ते रोड, तसेच फुले रोडचा काही भागापर्यंत बंद झाली होती. दोन तासांनी संध्याकाळी सहानंतर पाणी कमी झाले, पाणी पुरवठा बंद झाल्याने त्या विभागाच्या कर्मचा-यांनी तातडीने काम हाती घेतले. मध्य रात्री उशिरापर्यंत ते काम सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. परिणामी काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. घटनास्थळी तातडीने पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, आणि यूद्धपातळीवर काम हाती घेतले.
डोंबिवली पश्चिमेला पाण्याची ४० मीटर व्यासाची पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाणी गेले वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 8:18 PM