लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शेतमालाला योग्य हमीभाव, कर्जमाफी मिळावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हा संप सुरू असल्याने त्याचा फटका डोंबिवलीतील दूध वितरणाला बसला आहे. अवघे ४० टक्केच दूध आल्याने उद्या शनिवारी कसेबसे त्याचे वितरण करता येणार आहे. अशीच स्थिती राहिली, तर ग्राहकांना दूध मिळणार नाही, अशी माहिती दुग्ध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली.डोंबिवली-कल्याणमध्ये ९० ब्रॅण्डेड कंपन्यांचे दूध येते. असे असले तरी कल्याण-डोंबिवलीत जवळपास १७५ डेअरी आहेत. या डेअरींवर दररोज सव्वा ते दीड लाख लीटर दुधाची विक्री होते. शेतकऱ्यांच्या संपाचा या व्यवसायाला फटका बसला आहे, असे पाटील म्हणाले. शुक्रवारी दिवसभरात ४० टक्केच दूध डोंबिवलीत आले. नाशिक व धुळ्यातून दुधाच्या गाड्या आल्या नाहीत. पोलीस बंदोबस्तात कराडहून डोंबिवलीला दूध आले. ते दूधग्राहकांना देण्यात आले. विकण्यासाठी दूध नसल्याने काही डेअरी बंद होत्या. मात्र, त्यांची संख्या तुरळक असल्याने ग्राहकांना त्याची झळ बसलेली नाही. काही ग्राहक दुधाचा साठा करत आहेत. त्यामुळे उर्वरित ग्राहकांना दूध मिळत नाही, असे पाटील म्हणाले.किमतीत वाढ होणार नाहीपोलीस बंदोबस्तासह आलेल्या दुधाबरोबर नवी मुंबईहून गोकूळ आणि अमुल दुधाच्या गाड्या आल्या. दूध कमी आले, तरी त्याची किंमत वाढणार नाही, अशी भूमिका दुग्ध व्यापारी असोसिएशनची आहे. त्यात काळाबाजार होऊ नये, यासाठी असोसिएशन प्रयत्नशील आहे. सरकारकडे दुधाची पावडर असेल, तर दुधाची टंचाई भासणार नाही. ग्राहकांना सरकार दूध उपलब्ध करून देऊ शकते, असे पाटील म्हणाले.कल्याणच्या दूधनाक्यावरील व्यवहार सुरूचकल्याणमध्ये ब्रॅण्डेड दुधाव्यतिरिक्त तेथील दूधनाक्यावर जवळपास पन्नासपेक्षा अधिक व्यापारी म्हशीचे दूध विकतात. त्यांचे तबेले कल्याण शहरातच आहेत. त्यामुळे दूधनाका परिसराला शेतकरी संपाची झळ बसलेली नाही. येथे ५५ ते ६० रुपये लीटर या दराने शुक्रवारी दूध विकले गेले.
डोंबिवलीत आले ४० टक्केच दूध
By admin | Published: June 03, 2017 6:17 AM