ठाणे : दोन दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून मुंबईकडे (सीएसएमटी) जाणारी वाहतूक सेवा ठप्प झाली होती. तसेच ठाण्याहून कर्जत-कसाऱ्याकडील वाहतूकही रडतखडत सुरू होती. त्यामुळे ठाणे स्थानकामध्ये गर्दी झाल्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत ठाण्यातून कर्जत-कसारा, बदलापूर, टिटवाळासाठी ४० विशेष लोकल सोडण्यात आल्या. तसेच दुपारी साडे चारपर्यंत तीन दादर लोकल सोडण्यात आल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाने दिली.पावसाने सोमवारी रात्रीपासूनच धुमशान घातल्यामुळे मुंबईतील काही रेल्वे स्थानकांतील रुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात गर्दी वाढल्यामुळे मंगळवारी रात्री ठाण्यातून विशेष गाड्या सोडण्यात आल्या. पहाटेपर्यंत पाऊ स सुरू राहिल्यामुळे रुळांत साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत असल्याने सकाळीही मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. ठाण्यातून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पहिली दादर लोकल सोडण्यात आली, तर दुपारी चार वाजेपर्यंत ठाण्यातून तीन गाड्या दादर मुंबईकडे रवाना झाली. याचदरम्यान सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत ठाण्यातून टिटवाला ९, कर्जत १०, कसारा १० आणि बदलापूर ९ अशा विशेष लोकल गाड्या सोडल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाने दिली. तर, दुपारी दीडच्या सुमारास सीएसएमटीकडून धीम्या गाड्यांची एखादी-दुसरी ठाणे स्थानकात येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, ठाण्यातून मुंबईकडे जाणाºया गाड्यांना चांगला विलंब होत होता. सकाळीच शासकीय कार्यालयांना शासनाकडून सुट्टी जाहीर केल्याने चाकरमान्यांनी घरातून बाहेर पडणे टाळले. त्यामुळे ठाणे स्थानकात नेहमीपेक्षा मंगळवारी कमी गर्दी होती.बाहेरगावी जाणाºया एक्स्प्रेस गाड्या रात्रीपासून मुंबईतून ठाण्यात येत नव्हता. त्यातच त्या गाड्यांची माहितीही स्थानकावर दिली जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रबंधक कार्यालयात गर्दी केली होती. साहेब गाडी येणार आहे की रद्द झाली. मग, आॅनलाइन तिकीट आहे. अशा प्रश्नांचा मारा केला जात होता.शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने ठाणे आरटीओ कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट होता. तसेच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातही कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
कर्जत-कसारा मार्गावर ठाण्यातून सोडल्या ४० विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 12:35 AM