अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून प्रत्यक्ष शाळा भरत नसल्याने शहरातील सुमारे १५ शाळांच्या ४०० बस जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे सुमारे चार हजार चालक, क्लीनर यांचा व्यवसाय बुडाल्याने त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहेत. ही चिंतेची बाब असून शाळा लवकर सुरू व्हाव्यात आणि कुटुंबाची उपासमार थांबावी, अशी अपेक्षा बसचालक व क्लीनर यांनी केली आहे.
मागील वर्षी सुरुवातीला शाळांच्या बस या खासगी कंपन्यांच्या सेवेसाठी देण्याचा प्रस्ताव आला होता. परंतु, सातत्याने होणारे लॉकडाऊन आणि निर्बंध, यामुळे समस्येत वाढ झाली. त्यामुळे स्कूल बसचालकांचा रोजगाराचा आशेचा किरण संपुष्टात आला. त्याचबरोबर इतर कामांसाठी बसचा वापर बंद झाला. परिणामी, बसचालकांना पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करावे लागले. पण अनेकांचे वय चाळीशीच्या पुढे असल्याने अन्य काम करताना त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.
------------
बसचे थकले हप्ते
बहुतांशी व्यावसायिकांनी कर्ज काढून बस अथवा स्कूल व्हॅन घेतल्या आहेत. त्यामुळे वाहन कर्जाचे हप्ते थकले असून, ते कसे भरायचे? हा मोठा पेच त्यांच्यापुढे आहे. सुरुवातीला काही दिवस वाटणारे हे संकट आता दुसऱ्या वर्षीही सुरू असल्याने या बस पांढरा हत्ती पोसण्यासारखी गंभीर स्थिती झाली आहे. त्यात शाळा बंद ठेवण्याचे निर्णय वाढत असल्याने किती काळ बस जागेवरच उभ्या ठेवायच्या याचीही चिंता व्यावसायिकांना भेडसावत आहे.
--------
शहरातील स्कूल बस असणाऱ्या शाळा - १५
एकूण स्कूल बस - ४००
-------------
शहराबाहेर रस्त्यालगत बसचे पार्किंग
शहरातील शाळांच्या बस या सध्या शाळांच्या आवारात अथवा शहराबाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. काही बस या शाळा प्रशासनाच्या आहेत, तर काही शाळा कंत्राटदारामार्फत बस चालवत आहेत. शाळांची फी तसेच बसची फी पालक भरत नसल्याने शाळा व कंत्राटदारांच्या समस्येत वाढ झाली आहे. बस केवळ जागेवर उभ्या ठेवून चालत नाही. त्यांच्या देखभालीचा प्रश्नही मोठा आहे. एरवी सुटीच्या कालावधीत बस लग्न, सहल आदींसाठी वापरता येतात. पण आता मंगल कार्य, पर्यटनही बंद असल्याने व्यवसाय पूर्णत: बुडाला आहे. त्यामुळे बसची देखभाल कशी करायची, असा सवाल बसचालक करीत आहेत.
---------------
गाडीवरील कर्ज कसे फेडणार?
बस विकत घेण्याचा आनंद मोठा असतो, पण लाखो रुपयांचे कर्ज काढून घेतलेली बस जागेवर उभी राहिली की चिंता सुरू होते. त्यातून पैसा किती मिळेल यापेक्षा वाहन सुरू राहणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी काहीच उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे कुठून या व्यवसायात पडलो? अशी मानसिक अवस्था झाली आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे.
- स्कूल बस कंत्राटदार
---------
वाहनावर कर्ज आहे की नाही हा प्रश्न नाही. वाहन धावत असले की आपोआप व्यवहार सुरळीत होतात. त्यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू व्हायला हवेत. आतापर्यंतचे नुकसान भरून काढता येणे शक्य नाहीच, पण यापुढे वाहने जागेवर उभी राहिली तर मात्र जगणे कठीण होणार आहे.
- एक बसचालक
---------
चालकांचे हाल वेगळेच
सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही कुुटुंब आहे. सगळ्यांना सरकार काहीना काहीतरी मदत करीत आहे. पण आमचे खासगी बसचालक, क्लीनर यांचे काय? मालकाकडे पैसे नाहीत, ते कर्जात असताना आम्ही नेमके काय करायचे? कोणाकडे अपेक्षा करायची? कुटुंबाच्या समस्या वाढत आहेत. आम्हाला मार्ग दिसेनासा झाला आहे.
- चिंताग्रस्त वाहनचालक
-------
बसचालकाला किमान २० हजार, तर क्लीनरला आठ हजार पगार असतो. दीड वर्ष झाले पगार नाही. काही महिने रेशन मिळाले, पण तेवढ्यावर चालत नाही. वीजबिल, घरभाडे, मुलांचे शिक्षण अशात घर चालवायचे तरी कसे? वय वाढल्याने अन्य काम झेपत नाही. गॅस महागला, वीजबिल भरमसाट, महागाई वाढलेली.. कसा दिवस घालवायचा? कसले भविष्य अन् कसले काय?
- एक त्रस्त क्लीनर
------------