भिवंडी: शहरात नशेसाठी कफ सिरपचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून भिवंडी गुन्हे शाखेने भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत ५ लाख ७१ हजार रुपये किमतीच्या ४ हजार मादक पदार्थ म्हणून उपयोगात येणाऱ्या कप सिरपच्या बाटल्यांचा साठा रविवारी जप्त केला आहे.
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणावर नशेसाठी मादक पदार्थ म्हणून खोकल्याच्या विकारावर औषध म्हणून उपयोगात येणारे कफ सिरप सर्रास पणे वापरले जाते.भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारा मार्फत शहरातील ईदु कम्पाउंड,गौरीपाडा येथील आझमी इमारतीचे जिन्याला लागुन असलेल्या एका गाळयात मोठ्या प्रमाणावर कफ सिरापच्या बाटल्यांचा साठा असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत समजली होती.त्यानुसार भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी प्रतिबंधित कफ सिरपच्या वेगवेगळ्या नावाच्या एकुण ४ हजार बाटल्या विक्री करण्यासाठी बेकायदेशिर साठा केलेला आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी सिराज राशीद खान वय २९ याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.