डोंबिवली : डोंबिवली ते मुंबई प्रवासासाठी अपुऱ्या बससेवेमुळे सोमवारी पाच तास लागल्याच्या त्रासदायक अनुभवानंतर मंगळवारी काही चाकरमान्यांनी घरीच थांबणे पसंत केले. त्यामुळे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात तुलनेने कमी गर्दी दिसून आली. मात्र कल्याणमध्ये मुंबईला जायला बस सुविधा सुरू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकासमोरील एसटी स्थानकात तोबा गर्दी झाली होती. मुंबई, ठाणे, बदलापूर मार्गावर दिवसभरात ४१५ लालपरी मंगळवारी सोडण्यात आल्याने गर्दी आटोक्यात आली.
राज्य परिवहन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कल्याण, डोंबिवलीमध्ये झालेली गर्दी बघता मंगळवारी जादा बसगाड्या मागविण्यात आल्या. त्यामुळे सकाळपासून गर्दीवर नियंत्रण मिळाले होते. सोमवारी अनलॉक झाले असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. साहजिकच एसटी बसगाड्या जेवढ्या प्रमाणात हव्या होत्या तेवढ्या आल्या नाहीत. त्यामुळे गर्दी वाढली, प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बसगाड्या मागविण्यात आल्या.सकाळच्या सत्रात दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई, ठाण्याकडे जाण्याकरिता १६५ बस सोडल्या होत्या, तसेच २ ते संध्याकाळी ५ पर्यंत १५० बस सुटल्या होत्या. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत आणखी १०० बस सोडल्याची माहिती कल्याणमधील महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कल्याणमध्ये एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टन्स चांगल्या पद्धतीने पाळले गेले. एका बसमधून ३५ प्रवाशांनी प्रवास केला. डोंबिवली येथेदेखील एसटी बस, खासगी वाहने यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे गर्दी फारशी दिसून आली नाही. रामनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी सकाळपासून इंदिरा चौकात कडक बंदोबस्त ठेवून रांग लावण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते.‘लोकमत’चे आभार‘लोकमत’ने मंगळवारी डोंबिवली- मुंबई प्रवासासाठी पाच तास लागल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये सोमवारी चाकरमान्यांना जो त्रास झाला त्याविरुद्ध आवाज उठविण्यात आला होता. त्याची दखल घेत राज्य परिवहन मंडळाने मंगळवारी जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईला अत्यावश्यक सेवेकरिता जाणाºया कर्मचाºयांनी तसेच अन्य खासगी आस्थापनांमधील कर्मचाºयांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’चे आभार मानले.