ठाणे, दि.18 - बनावट कागदपत्रांच्या आधारे ४२ लाखांची फसवणूक करणा-या दिलीप दुर्गूळे याच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्याच्या लालबहाद्दूर शास्त्री मार्गावर राहणारे दिलीप, गणेश आणि रविकुमार दुर्गूळे या तीन भावांनी आपसात संगनमत आणि कट करुन मीठ गॅलेक्सी या इमारतीमधील गाळा क्रमांक ६०१ या जागेबद्दल मुंबईच्या कांदीवली येथील रहिवाशी परेश मिश्रा यांच्याकडून २६ लाख रुपये अनामत रक्कम घेतली. अनामत घेऊनही त्यांनी ती भाडयाने न देता त्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवून ती मिश्रा यांनी दिली. या जागेच्या मोबदल्यात मिश्रा यांच्याच इमारतीमधील दुस-या माळयावरील गाळा क्रमांक २०१ ही जागा गणेश आणि रवी हे विकत देतील, असे दिलीप याने सांगितले. मात्र, गाळाही न देता त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन एकूण ४२ लाख रुपये उकळले. यातून मिश्रा आणि त्यांच्या कंपनीची २५ नोव्हेंबर २०१४ ते ३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १७ आॅगस्ट रोजी दाखल केली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे ४२ लाखांची फसवणूक, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:06 PM