कल्याण : केडीएमसीच्या कचरागाड्यांवरील सात चालक व ३५ कामगार सोमवारी सकाळी खंबाळपाडा येथील आगारात कामावर आले होते. मात्र, हजेरी पुस्तकावर ११ वाजताच ते दुपारी १ वाजताचे आउट टाइम टाकून घरी परतले. ही बाब सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उघडकीस आणली असून, या कामगारांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पुरेसे कामगार असतानाही कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले आहे.
खंबाळपाडा येथील बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरागाड्या उभ्या केल्या जातात. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ राणे यांनी तेथे सकाळी ११.३० वाजता अचानक भेट दिली. तेथील कामगारांचे हजेरी पुस्तक तपासले असता सात कामगार कामावर हजर असल्याची नोंद होती. मात्र, हे कामगार कामावर हजर नव्हते. ते ११.३० वाजताच दुपारी १ वाजताची वेळ लिहून बाहेर पडल्याचे उघड झाले.
कचरा उचलणाºया एका आरसी गाडीवर एक वाहनचालक आणि पाच सफाई कामगार असतात. सात आरसी गाड्यांवरील सात चालकांची नोंद हजेरी पुस्तकावर होती. मात्र, या चालकांप्रमाणे ३५ सफाई कामगारांनी वाहनचालकांचाच कित्ता गिरवत १ वाजताची नोंद करून त्याआधीच घर गाठले होते. हा प्रकार पाहून सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरात ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही. कामगार हजेरी लावून पळ काढतात, हा काय प्रकार आहे, याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अमित पंडित व अधिकारी विलास जोशी यांना तेथे पाचारण केले. ते आल्यानंतर उपायुक्तांचे कामगारांवर नियंत्रण नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा आरोप सदस्यांनी केला. उपायुक्त व आयुक्तांनी कामगारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ते नसल्याने कामगार हजेरी लावून कचरा उचलण्याचे काम केल्याचे भासवत आहे. आरोग्य निरीक्षकांची त्यांना साथ आहे. कामगार व अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अधिकारी व कामगारांच्या विरोधात कडक कारवाई करावी. तसेच या कामगारांना सेवेतून तातडीने निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यावर या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पंडित यांनी सांगितले.अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपमहापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटी रुपयांचे कंत्राट आर अॅण्ड डी कंपनीला दिले आहे. ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची वाहतूक करणे, याचा समावेश आहे.या कंत्राटामुळे चार प्रभाग क्षेत्रांतील कामगार अन्य सहा प्रभाग क्षेत्रांत कामाला लावता येतील, असा त्यामागील विचार होता. मात्र, कामगार हजेरी लावून घरी पळ काढतात. त्यामुळे शहरात कचºयाची समस्या कायम आहे. त्याला अधिकारी जबाबदार आहेत. तसेच कंत्राटदाराने गणवेश व सुरक्षेची साधने पुरविलेली नाहीत, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे.