लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नाला रुंदीकरणात बाधित झालेल्या ४३ कुटुंबांचे रेंटलच्या २१ घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु, आता ११ महिन्यांनंतर त्यांना अखेर न्याय मिळाला असून या ४३ कुटुंबांना चाव्यांचे वाटप महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम हाती घेताना रहिवाशांना पुनर्वसनाची हमी मिळत असल्याने तिला यश आल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वागळे इस्टेट येथील सम्राटनगर भागातील नाला रुंदीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले होते. त्यानुसार, येथील रहिवाशांना १० जूनच्या रात्री ११ वाजता घरे खाली करण्यास सांगून त्यांना मानपाडा येथील रेंटलच्या घरांमध्ये पुनर्वसनाची हमीदेखील दिली. त्यानुसार, घरे मिळणार या हेतूने या रहिवाशांनी तयारी दर्शवली. त्या वेळेस ४३ कुटुंबांना तेथून हलवण्यात आले. परंतु, रेंटलच्या घरांची संख्या कमी असल्याचे सांगून तुम्हाला तात्पुरते २१ घरांमध्ये अॅडजस्टमेंट करून राहावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यालाही त्यांनी त्यास होकार दिला. परंतु, ११ महिने पालिकेच्या खेटा घालूनही तुमचे काम आज होईल, उद्या होईल, फाइल रेडी होत आहे, अशी उत्तरे त्यांना प्रशासनाकडून देण्यात आली. ११ महिन्यांनंतरही न्याय न मिळाल्याने या रहिवाशांनी मागील आठवड्यात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार, महापौरांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या रहिवाशांना तत्काळ घरे द्यावीत, असे आदेश दिले होते.
‘रेंटल’मधील ४३ कुटुंबांना मिळाला न्याय
By admin | Published: May 16, 2017 12:08 AM