ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन लसीकरण बंद ठेवले होते. त्यानंतर सोमवारी २८ केंद्रांवरच लसीकरण सुरू होते; परंतु शासनाकडून १५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याने मंगळवारी शहरातील ४३ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले, तसेच आणखी पुरवठा झाल्यास ५६ केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.
जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत दोन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे; परंतु लसीकरणाचा अपुरा साठा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन महापालिकेने दोन दिवस लसीकरण बंद केले होते, तर सोमवारी ५६ पैकी केवळ २८ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. खासगी रुग्णालयांतील लसीकरणदेखील बंद होते. लसींचा साठा दुपारनंतर उपलब्ध झाल्याने आता मंगळवारी पुन्हा खासगीसह महापालिकेच्या मिळून ४३ केंद्रांवर लसीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याची माहिती महापालिकेने दिली.