ठाणे - चोरांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांना ओळखणे, गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत व्हावी तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यास सोपे जावे यासाठी घोडबंदर पट्ट्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेने आतापर्यंत विविध ठिकाणी बसवलेल्या कॅमेरांमुळे चोरी तसेच अन्य गुन्ह्यांची उकल होण्यास काही प्रमाणात मदत होत असून घोडबंदर पट्ट्यातील आतील परिसरात या कॅमेरांचा चांगलाच उपयोग होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. घोडबंदर पट्ट्यातील महत्वाच्या चौकात आणि महत्वाच्या ठिकाणी जिथून गुन्हेगारांना पळणे शक्य आहे अशा ठिकाणी पोलिसांनी सुचवलेल्या ठिकाणी हे ४४ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मागील काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरवात झाली आहे. शहरात काही ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असले तरी नवीन ठाणे अशी ओळख निर्माण झालेल्या घोडबंदर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देखील कॅमेरे बसवण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून या प्रस्तावाला स्थायी समितीनेसुध्दा मंजुरी दिली आहे. गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यासाठी अशा प्रकारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत चांगली होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष करून सुनसान परिसर, सर्व्हीस रोड आणि हायवेवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याची चांगली मदत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एखाद्या परिसरात गुन्हा घडला असेल तर यापूर्वी त्या परिसरात जवळपास असलेल्या हॉटेल्स किंवा खाजगी स्वरूपात बसवण्यात आलेल्या कॅमेरांवर अवलंबून राहावे लागत होते. काही ठिकाणी तर कॅमेरेसुद्धा नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष दर्शींवर पोलिसांना अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि मुख्य चौकात तसेच अन्य महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असल्याने तपासाला देखील वेग आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत कापूरबावडी पर्यंत महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर पुढच्या पट्ट्यात गायमुख आणि नागला बंदर परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र घोडबंदरचा पट्टा विशेष करून आतील परिसर जिथे या कॅमेऱ्याची खरी गरज आहे अशा ठिकाणी हे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यानी दिली. घोडबंदर पट्ट्यात बसवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याची संख्या - ब्रम्हांड सिग्नल-८, पातलीपाडा उड्डाणपुलाखाली -७, वाघबीळ जंक्शन -७, आनंदनगर जंक्शन -४, फ्लोरा बिल्डींग -३, हिरानंदानी इस्टेट -३,भूमी एकर सर्कल, वाघबीळ -३, पालिका आयुक्त बंगला -३, ब्रह्मांड जंक्शन -३, आझाद नगर सर्कल -३एकूण कॅमेरे : ४४ - निधी : २५ लाखसंपूर्ण शहरात बसवण्यात येणाऱ्या कॅमऱ्याची संख्या -१६००आतापर्यंत बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याची संख्या ३००, यामध्ये २०० सामान्य कॅमेरे तर १०० वायफाय योजने अंतर्गत, यावर्षी बसवण्यात येणाºया कॅमेºयांची संख्या -१ हजार यामध्ये सामान्य आणि वायफाय योजने अंतर्गत ३०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
घोडबंदर पट्याला लाभणार ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच, वाढत्या चोरीच्या घटनांवर बसणार आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:34 PM
वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासात मदत कार्य करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता घोडबंदर पट्यात महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी केला जाणार खर्चमहत्वाच्या चौकात लागणार कॅमेरे