- मुरलीधर भवार, कल्याण
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करायचे असेल तर बारावे येथील क्षेपणभूमी विकसित करण्याची गरज आहे. मात्र आधी आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराने माघार घेतल्यानंतर आता बारावेतील कंत्राटदारानेही माघार घेतली आहे. त्याची ४४ लाखांची अनामत रक्कम पालिकेने जप्त केली आहे. डम्पिंगच्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप, दबाव, नागरिकांची आंदोलने-निदर्शने आणि याचिकांच्या दडपणामुळे ही माघार घेतली गेल्याची चर्चा आहे. मात्र पालिकेतील एकही अधिकारी त्यावर स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही. आधारवाडीचे डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कंत्राटदाराला काम देण्यात आले होेते. त्याने कामही सुरु केले नाही. त्याची २२ लाखाची अनामत रक्कम पालिकेने महिनाभरापूर्वी जप्त केली. बारावे भरावभूमीच्या कामाचे कार्यादेश देऊनही कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नसल्याने त्याची ४४ लाखांची रक्कम जप्त झाली आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करुन बारावे येथे शास्त्रोक्त भरावभूमी तयार करण्याचे ठरले होते. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे काम २८ कोटींचे होते. हे डम्पिंग बंद झाल्यावर कचरा बारावे येथे टाकला जाणार होता. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमुळे नागरीक बेजार झालेले असतानाच बारावे येथे भरावभूमी तयार करण्यास तेथील २२ गृहसंकुलातील नागरिकांनी विरोध केला. त्यासाठी महापालिकेविरोधात मोर्चा काढला. नागरिकांचा विराध पाहून आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी पुढे आलेल्या कंत्राटदाराने काढता पाय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती बारावे भरावभूमीबाबतीत घडली. बारावेचे काम अग्रवाल सोल्यूशन कंपनीला देण्यात आले होते. ते काम सुरु करीत नसल्याने १ जूनपासून महापालिकेने दररोज एक हजार रुपये दंड ठोठावला. तसेच त्याला सात वेळा नोटीस बजावली. त्याला कंपनीने प्रतिसाद दिला नाही. अखेरीस कंपनीची अनामत जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले.फेरनिविदा आज : आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी १६ जूनला कंत्राटदाराचे २२ लाख जप्त करुन कंत्राट रद्द करण्यात आले. आधारवाडी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेत. त्या उद्या, २६ जुलैला दुपारपर्यंत उघडल्या जाणार आहेत. ई टेंडरिंग असल्याने कोणत्या कंपन्या पुढे आल्या आहेत, याची माहिती अद्याप महापालिका प्रशासनास नसली तरी अॅन्थोनी, डेटाएक्स या कंपन्यांनी रस दाखविला होता. प्रत्यक्षात त्यांनी निविदा भरली की नाही हे उद्याच स्पष्ट होणार आहे. आधारवाडीपाठोपाठ आता बारावेसाठीही फेरनिविदा मागवावी लागणार आहे. बारावे परिसरातील रोसाली एनएक्स गृहसंकुलातील नागरिकांनी तेथील भरावभूमीला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात फेब्रुवारीमध्ये दाखल केली होती. तांत्रिक मुद्द्यामुळे न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली नव्हती. त्यांनी पुन्हा योग्यप्रकारे याचिका दाखल केल्यावर ती वेगळी याचिका म्हणून दाखल करून न घेता घनकचराप्रकरणी सुरु असलेल्या याचिकेत रोसालीला सबपार्टी म्हणून जोडून घेण्यात आले आहे. या मूळ याचिकेवर १६ आॅगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी १२ आॅगस्टच्या आत पालिकेने डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काय कार्यवाही केली, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे.