- सुरेश लोखंडे ठाणे - उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे महापालिकांसह नगरपालिकांची पाणीकपातीतून काही अंशी सुटका झाली. मात्र मागील अनुभव लक्षात घेता यंदाही १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणांती उघडकीस आले. अंबरनाथ, कल्याण या शहरी तालुक्यांसह भिवंडी, मुरबाड आणि तलावांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूरच्या सर्वाधिक गावांना टंचाई भेडसावणार आहे.शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना मागील वर्षी १८ टँकरव्दारे पाणीपुरवठा झाला. मुरबाडच्या चार गावपाड्यांना तीन टँकरने गेल्यावर्षी पाणीपुरवठा केला. या उन्हाळ्यात मात्र शहापूरची ७८ गावे, १९० पाड्यांना पाणीटंचाई भासेल, तर मुरबाडची २४ गावे- ६५ पाडे, भिवंडीची दोन गावे- ३८ पाडे, कल्याणची १० गावे- १७ पाडे आणि अंबरनाथमधील सात गावे व १७ पाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता सर्व्हेअंती निश्चित करण्यात आली. शहापूरच्या ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होणार असून त्यासाठी ९० लाखांची तरतूद केली आहे, तर मुरबाडचे १४ गावे आणि ३० पाड्यांसाठी १९ लाख खर्चून टँकरव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी १७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून दहा गावे आणि ११ पाड्यांच्या योजना दुरूस्त होतील. शहापूर तालुक्यात खर्डी येथील दोन कोटींच्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही तालुक्यास योजना मंजूर केलेली नाही.नव्या विंधन विहिरीटंचाईच्या या काळात यंदा तलावातील गाळ काढण्याचे नियोजन नाही. तसेच विहिरीही खोल केल्या जाणार नाहीत. पण एक कोटी ७० लाख खर्च करून ३८ गावे आणि १२९ आदिवासी पाड्यांसाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जातील.असा होईल खर्च : सर्वाधिक शहापूर तालुक्यात चार कोटी ११ लाख, मुरबाडला ७३ लाख ६० हजार रूपये, भिवंडीसाठी २६ लाख, कल्याणसाठी ५१ लाख आणि अंबरनाथसाठी ८७ लाख २० हजार रूपयांच्या खर्चाची तजवीज करण्यात आली आहे.
४४८ पाड्यांत तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 7:16 AM