- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत लिपिकसह मजूर, माळी, विधुत मदतनीस आदीचे पदे ४५ टक्के पेक्षा जास्त रिक्त असल्याने, त्यापैकी काही पदे कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के पदे रिक्त असून त्या पदाचा प्रभारी पदभार लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे गेल्याने, महापालिकेतत गोंधळ उडाला आहे.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के पदे रिक्त असल्याने, त्यांचा पदभार लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यावर देण्यात आला. या प्रभारी अधिकाऱ्याचे महापालिकेत मक्तेदारी निर्माण होऊन महापालिका कारभारात गोंधळ उडाल्याची टीका होत आहे. आतातर लिपिकसह अन्य दर्जाचे ४५ टक्के पदे रिक्त असल्याचे उघड झाले. ५ जानेवारी रोजी होणाऱ्या स्थायी समिती सभेत एका प्रस्तावात लिपिकसह मजूर, माळी, विधुत मदतनीस आदीची पदे रिक्त असल्याचा उल्लेख करण्यात आला. महापालिका कारभार चालविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काही पदे घेण्याचा प्रस्ताव आला आहे. प्रस्तावात लिपिकाचे ११८, मजुरांची १८६, माळीची ३८ तर विधुत मदतनीसाची १५ पदे रिक्त असल्याचे दाखविण्यात आले.
महापालिका कारभार हाकण्यासाठी सद्यस्थितीत लिपिकाची २५, मजुराची २०, माळीची १५ तर विधुत मदतनीसाची १५ ही पदे ठेकेदार पद्धतीने कंत्राटी घेण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत आला. या कंत्राटी कामगारांवर वर्षाला १ कोटी ७९ लाख खर्च येण्याचे दर्शविले आहे. यापूर्वी महापालिकेने अग्निशमन विभागात कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पाणी पुरवठा विभाग, नागरी सुविधा केंद्र आदी विभागात शेकडो कंत्राटी कामगार घेतले आहे. महापालिकेची सुरक्षा तर खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हाती गेल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. यासह कोरोना काळात महापालिकेने नर्स, वॉर्डबॉयसह अन्य पदे कंत्राटी पद्धतीने महापालिकेने भरली आहे. कोरोनाची तिसरी लाट बघता त्यांनाही मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत आला आहे.