शशी करपे, वसईजागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरटीओ कार्यालयातून तब्बल ४५ महिलांना रिक्षा परवाने मिळाले असून त्यांना आता आर्थिक उत्पन्नाचे कायमस्वरुपी साधन उपलब्ध झाले आहे. यात ५ मुस्लीम आणि ४ ख्रिस्ती समाजातील महिलांचा समावेश असून सर्वच महिला पिढीजात वसईतील रहिवाशी असल्याने त्या खऱ्या अर्थाने मराठी भाषिकच आहेत. परिवहन विभागाने काढलेल्या रिक्षा परवाना लॉटरीत वसईतील १ हजार ५३४ जणांचे भाग्य उजळले. त्यामध्ये तब्बल ४५ महिलांचा समावेश आहे. वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विरार येथील कार्यालयात २९ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत विजयी उमेदवारांच्या मराठीची मौखिक चाचणी घेण्यात आली. यासाठी आलेल्या ४५ महिला अस्सल मराठी भाषिक असल्याने उत्तीर्ण झाल्या. चुळणे गावात राहणाऱ्या सिसिल कोलासो (३७) या पहिल्या परवाना विजेत्या ठरल्या. त्यांना उपप्रादेशिक अधिकारी अभय देशपांडे यांच्या हस्ते परवाना देण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत चाललेल्या चाचणीमध्ये ४५ महिला उत्तीर्ण झाल्या असून त्यांना रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये मुस्लीम समाजातील इशरत शेख, नूर हुसेन सय्यद, रुबीना शेख, रेश्मा शेख, अनिशा शेख यांना रिक्षा परवाने मिळाले. तर ख्रिस्ती समाजातील सिसिल कोलासो यांच्यासह गीता पिंटो, व्हियन्नी पिंटो, अनिसिटो फर्नांडीस यांना परवाने मिळाले. उर्वरित ३६ महिला मराठी आहेत. नऊ महिला इतर समाजातील असल्या तरी त्या पिढीजात वसईतील रहिवाशी असून अस्सल मराठी भाषिक आहेत. विशेष म्हणजे सर्व महिलांनी बेधडक मराठी भाषेची चाचणी परिक्षा दिली. यातील सर्वच महिला मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आहेत. अनिता कुडतरकर या वसईतील पहिल्या मराठी रिक्षा चालक होत्या. त्यानंतर या ४५ महिलांनी रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन लायसन्स आणि बॅज काढल्यानंतर रिक्षा परवान्यांसाठी अर्ज केले होते. सर्वच महिलांना आपल्या चाचणी परिक्षेत स्वत: रिक्षा चालवून असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती महिला रिक्षा चालवणार हा खरा प्रश्न आहे. असे असले तरी कायद्यात परवानाधारकाने रिक्षा चालवली पाहिजे अशी कोणतीच अट नसल्याने त्यांना ड्रायव्हर नेमता येते. त्यामुळे या महिलांना रोजगाराचे कायमस्वरुपी साधन निर्माण झाले असून यामुळे महिला स्वावलंबी होण्याचा मार्ग इतर महिलांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.महिलांच्या सुरक्षिततेसाठी १० महिला बीट मार्शल आणि दामिनीची टीमवसईत चैनस्रॅचिंगच्या वाढत्या घटना आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला बिट मार्शल आता मोटार सायकलवरून वसईत गस्त घालताना दिसणार आहेत. या बिट मार्शल निर्जन रस्ते, शाळा-कॉलेजचा परिसर, बाजारपेठा यासह महिलांचा वावर असलेल्या ठिकाणी बाईकवरून गस्त घालून चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. तसेच पोलिसांच्या गस्तीपथकातही सामील होणार आहेत. या दहा बिट मार्शल बिट मार्शल विभागात रुजू झाल्या आहेत. वसई विरार महापालिका पोलिसांना मोटार सायकली देणार आहेत. त्यातील दहा बाईक महिला बिट मार्शलना देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चार महिला पोलिसांचे पथक जीप गाडीतून वसईत फिरणार आहे. महिलांवर अत्याचार होत असल्याची खबर मिळताच ही टीम घटनास्थळी पोचणार आहे.
रिक्षा परवान्यामुळे वसईतील ४५ महिलांना रोजगार
By admin | Published: March 08, 2016 1:45 AM