ठाणे : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ठाणे जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (सर्वसाधारण) २०२१-२२ या वर्षासाठी ४५० कोटी रुपयांच्या आराखड्यास गुरुवारी मान्यता देण्यात आली.
जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत २०२१-२२ च्या आराखड्यासाठी ३३२.९५ कोटी रुपयांची मर्यादा शासनाने दिली होती. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीत नियतव्ययाच्या मर्यादेत आराखडा केला होता. विविध विभागांची अधिकची मागणी लक्षात घेऊन ११७ कोटी रुपयांचा वाढीव म्हणजेच ४५० कोटी रुपयांच्या आराखड्यास या झालेल्या बैठकीने मान्यता दिली.
बैठकीस राज्याचे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, जि.प. अध्यक्षा सुषमा लोणे, सर्व आमदार, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे आदी उपस्थित होते.
सवाद येथे होणार जिल्हा रुग्णालय
भिवंडी तालुक्यातील सवाद येथे सध्या असलेले कोविड रुग्णालय हे कायमस्वरूपी जिल्हा रुग्णालय करण्यासाठी निधीची मागणी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाशी विचार-विनिमय करून येत्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांपैकी खालील निकषांची पूर्तता करणाऱ्या एका जिल्ह्यास प्रोत्साहनपर आनुदान देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये आय-पास प्रणालीचा प्रभावी वापर करणे, नियोजन समितीच्या नियमित बैठका घेणे, अखर्चित निधी कमी करणे, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे, शाश्वत विकासाचे ध्येय प्रगती, अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती घटकांसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, नानीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे आदी कामांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत होणाऱ्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीव निधीची माहिती दिली.