ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वृक्षतोडीचे चार प्रस्ताव दाखल झाले असून त्यानुसार जवळपास ४६० वृक्षांवर कुºहाड चालवली जाणार आहे. पुनर्रोपणाच्या नावाखाली वृक्षतोडीला परवानगी देण्याचे प्रकार पालिकेत सुरूच आहेत. आधीच तीन हजारांपेक्षा अधिक झाडांच्या पुनर्रोपणाचा तिढा सुटलेला नसताना आता आणखी ४६० झाडांची भर पडणार आहे. तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावायची कुठे, याबाबत पालिका प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.
कौसा येथील जोडरस्त्यांच्या कामांमध्ये २,८७४, कोपरी रुंदीकरणाच्या कामात २४२, तर मेट्रोच्या कामात एक हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार आहे. ही झाडे लावायची कुठे, याबाबत अजूनही पालिका प्रशासनाचे निश्चित धोरण नाही. कौसा जोडरस्त्याच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करायचे की, आणखी काय करायचे, याबाबतदेखील वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे ही सर्व झाडे लावायची कुठे, हा तिढा सुटलेला नसताना आता तब्बल ४६० वृक्षतोडीचे प्रस्ताव विकासकांच्या मध्यातून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे दाखल झाले आहेत. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत तीन रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कल्याणफाटा दत्त मंदिर ते २५ मीटर डीपी रस्त्यापर्यंत ३० मीटर रु ंद डीपी रस्त्याचे काम केले जाणार आहे. दुसरा कल्याण-शीळ रस्त्यापासून घनकचरा प्रक्रि या केंद्राकरिता राखीव असणाºया भूखंडाकडे जाणाºया २५ मीटर रुंद डीपी रस्ता, तर तिसरा मिनार रेसिडेन्सी ते कल्याण-शीळ रोडपर्यंत २५ आणि ४५ मीटर रु ंद डीपी रस्ता अशा तीन रस्त्यांमध्ये ३२३ वृक्ष बाधित होणार आहेत. त्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असून ४८ वृक्ष तोडले जाणार आहेत.
दुसरा प्रस्ताव मे. ओमकार डेव्हलपर्स यांच्याकडून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आला असून यामध्ये २० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शीळ येथील सेक्टर ११ सर्व्हे नं. २८ या ठिकाणी विकास करण्याचा हा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव माजिवडा येथील मे. डिझाइन कन्सोटियन यांच्याकडून आला असून या विकासकामांमध्ये जवळपास ११ वृक्षांचे पुनर्रोपण, तर दोन वृक्ष तोडले जाणार आहेत. चौथा प्रस्ताव रेमण्ड कंपनीकडून दाखल करण्यात आला असून यामध्ये ४५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून सहा झाडे तोडली जाणार आहेत.२३00 वृक्षांचे करावे लागणार पुनर्रोपणमाजिवडा येथे एक धोकादायक वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव दाखल झाला असून एकूण ४६० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.यापूर्वी विविध कारणांनी तोडलेल्या वृक्षांच्या पुनर्रोपणाचा मार्ग खडतर असताना नव्याने तोडल्या जाणाºया वृक्षांचे पुनर्रोपण कशा पद्धतीने, कुठे आणि केव्हा केले जाणार, हा मोठा प्रश्न वृक्ष प्राधिकरण विभागाला पडला आहे.एका झाडाच्या मोबदल्यात पाच नवीन वृक्षलागवड करणे, असे धोरण आहे. त्यानुसार, ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्ष पालिकेला लावावे लागणार आहेत. हे काम पालिका तेवढ्या गांभीर्याने करणार आहे का, हा प्रश्नच आहे.