भिवंडी : मागील काही महिन्यांपासून शहर आणि परिसरात घरफोडी,चेन स्नॅचिंग व दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एका महिन्यात ४८ गुन्हे उघडकीस आणून २८ आरोपींना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींकडून ४७ लाख १० हजार ७८५ रूपयांचा ऐवज जप्त केला.ठाणे, कल्याण व भिवंडीतून चोरी झालेल्या १६ दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. तर चेन स्नॅचिंग प्रकरणी चार इराणी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख दोन हजारांचे दागिने जप्त केले आहेत. कासारवडवली येथे घरफोडी करून सोनाराला विकलेले ९ लाख ४० हजाराचे ३३६ ग्रॅम सोने व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.नारपोली, निजामपूर व शहर पोलीस ठाण्यातील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले. चोरलेल्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री करणाºया टोळीस पकडून १० लाख १६ हजार ५०० रूपयांचे २२० मोबाइल जप्त केले.
४८ गुन्ह्यांची उकल, भिवंडीतील घटना : २८ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:53 AM