- अनिकेत घमंडीडोंबिवली : मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळांवर पाणी साचले, त्यातून मार्ग काढताना लोकलचे मोटारकोच पार्ट भिजले आणि त्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवू नये, म्हणून रेक्सचे काम करण्यासाठी सुमारे ४८ लोकल कारशेडमध्ये उभ्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्ण क्षमतेने लोकल धावल्या नाही. कळवा, ठाकुर्ली-चोळा, सानपाडा, वांगणी, अंबरनाथ तसेच कुर्ला कारशेडमध्ये काही लोकल उभ्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पावसाने विश्रांती घेतल्याने बुधवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी अपेक्षित असतानाच रेल्वेने मेगाब्लॉकचा निर्णय घेतला. मात्र, प्रवाशांच्या प्रचंड रेट्यामुळे रेल्वे प्रशासनाला मेगाब्लॉक दुपारीच मागे घ्यावा लागला. सूत्रांच्या माहितीनुसार, कळवा कारशेडमध्ये १५, चोळा ४, सानपाडा १०, वांगणी २, अंबरनाथ सायडिंग २, कुर्ला १५ अशा पद्धतीने सुमारे ४८ लोकल कारशेडमध्ये तांत्रिक कामासाठी उभ्या होत्या. पावसात लोकल तासन्तास उभ्या होत्या. त्यामुळे मोटारकोच पार्टमध्ये समस्या उद्भवल्याने त्याची दुरुस्ती, ते सुकवणे आदी कामे करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. यासंदर्भात मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.लोकल पुरेशा नाही- अतिवृष्टीमुळे शासनाने मंगळवारी सुटी जाहीर केली होती. बुधवारी पुन्हा सुटी जाहीर करणे शक्य नव्हते. त्यातच, पावसानेही विश्रांती घेतली होती. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. लोकल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे रेल्वेने मेगाब्लॉक घेतला असावा, असेही जाणकारांनी सांगितले.
कारशेडमध्ये ४८ लोकल रखडल्या; मोटारकोच भिजल्याने समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 12:18 AM