ठाणे: खासगी बँकेतून काढलेले चार लाख ८८ हजार ७२० रुपयांचे कर्ज भरल्यानंतरही त्याचा बँकेत भरणा न करणाऱ्या वैभव बारंग या दलालाविरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
ठाण्याच्या दिवा भागात राहणारे विपुल बामणे (३०) यांनी जानेवारी २०२३ मध्ये वैभव या दलालाच्या मदतीने पाच लाखांचे कर्ज ॲक्सिस बँकेतून मंजूर केले होते. त्यातील चार लाख ८८ हजार ७२० रुपये त्यांच्या खात्यावर आले होते. आपल्याला साडेसहा लाखांची आवश्यकता असल्याने हे कर्ज नको असल्याचेही बामणे यांनी त्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे हे चार लाख ८८ हजार ७२० रुपये त्यांनी बारंग यांना परत पाठविले होते. मात्र, पाच लाख रुपयांची आपली कर्जाची रक्कम बारंग याने बँकेत भरलीच नसल्याची माहिती बामणे यांना मार्च २०२३ मध्ये मिळाली.
आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बामणे यांनी याप्रकरणी जानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीमध्ये बारंग याने कर्ज खाते बंद करण्याची बतावणी करीत चार लाख ८८ हजार ७२० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाखल केला. अशा प्रकारे बारंग याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का?, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.