उल्हासनगर : महापालिका परिवहन बस सेवेत पहिल्या टप्प्यात ५ बसेस दाखल होऊन मागील महिन्या पासून बस सेवा सुरू झाली. यामध्ये ५ बसेसची भर पडली असून बसेसची एकून संख्या १० झाली. तिसऱ्या टप्प्यात १० बसेस दाखल होण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेने सुरवातीला खाजगी ठेकेदारांच्या मदतीने महापालिका परिवहन बस सेवा सुरू झाली होती. मात्र तिकीट दरवाढ दिली नसल्याच्या कारणावरून ठेकेदाराने टप्याटप्याने बस सेवा बंद केली. तेंव्हा पासून परिवहन बस सेवा बंद होती. अखेर आयुक्त अजीज शेख यांच्या प्रयत्नातून महापालिका परिवहन बस सेवा मागील काही महिन्यांपासून सुरू झाली. एकून २० बसेस महापालिका परिवहन बस सेवेत दाखल होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ बसेस दाखल झाल्या होत्या. तर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात ५ बसेस दाखल झाल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. तर तिसऱ्या टप्प्यात १० बसेस दाखल होणार असून त्या बसेस वातानुकूलित असणार आहेत.
केंद्र शासनाने महापालिकेला १०० बसेस मंजूर केल्या असून बस आगरासाठी व बस डेपोच्या संरक्षण भीतीसाठी विशेष निधी दिला आहे. परिवहन बसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून कमी किंमतीत शहराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकावर परिवहन बसने जात येत असल्याने, नागरिकही सुखविले आहे. वरिष्ठ नागरिक, महिला यांच्यासह पत्रकारांना तिकीट दरात सवलत मिळणार असल्याचेही आयुक्त शेख यांनी सांगितले. महापालिका परिवहन बस सेवेत बसेची संख्या वाढल्याने बसच्या मार्गात वाढ झाली आहे.