उल्हासनगर : महापालिकेच्या रस्ता दुरूस्ती कामात ५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी करून सोमवारी झालेल्या महासभेत खळबळ उडवून दिली. तर मुख्य १६ रस्त्याच्या दुरूस्तीवर साडेसात कोटींचा खर्च झाला असून त्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी रस्ता दुरूस्ती न केल्याने, रस्त्याची दुरवस्था झाली होती. ऐन दिवाळी दरम्यान प्रभाग समिती मधील प्रत्येकी ४ असे एकूण १६ रस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीला २ कोटीच्या निधीतून आयुक्त देशमुख यांनी मान्यता दिली. मात्र निधी अभावी रस्त्याचे काम अर्धवट राहू नये म्हणून स्थायी समितीमध्ये निधी वाढवून देण्याचा प्रस्ताव आणण्यात आला.
स्थायी समितीत निधीच्या खर्चाची जबाबदारी आयुक्तांकडे देण्यात आली. त्यानुसार रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले असून रस्त्यावर आतापर्यंत साडेसात कोटीचा खर्च झाल्याची माहिती आयुक्तांनी महासभेत दिली. तर विरोधकांनी रस्ता दुरस्तीत ५ कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप करून अप्रत्यक्ष आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
देशमुख यांनी १६ मुख्य रस्त्यांशिवाय इतर रस्त्याच्या दुरूस्तीची निविदा लवकरच काढण्याचे संकेत दिले. गेल्यावर्षी रस्त्याच्या दुरूस्तीवर १६ कोटींचा खर्च झाला होता, अशी आठवण आयुक्तांनी विरोधकांना करून दिली. एकूणच रस्त्याच्या दुरूस्ती कामावरून विरोधक विरूध्द आयुक्त असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच गेल्यावर्षी रस्ता दुरस्तीवर १६ कोटींचा खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याची ओरड त्यावेळचे विरोधक शिवसेनेने केली होती.
आयुक्तांनी मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेऊन रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे संकेत दिले. तसेच नवीन वर्षात रस्ते चकाचक करण्याचे संकेत दिले. भाजपचे जीवन इदनानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी यांनी रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप केला. यामुळे शहरात पुन्हा राजकारण तापणार आहे.विनानिविदा केले ५ कोटीचे काममहापालिका आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखा अधिकारी व मुख्य लेखा परीक्षक यांनी विनापरवाना व निविदाविना साडेसात कोटीच्या निधीतून रस्त्याची दुरूस्ती केली, असा आरोप भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी केला. अत्यावश्यक कामाच्या आड विनानिविदा कोटयवधींचे काम करता येते का? असा प्रश्नही इदनानी यांनी विचारून ५ कोटीच्या रस्ता दुरूस्ती घोटाळयाच्या चौकशीची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे इदनानी यांनी सांगितले.