ठाणे, दि. 29 - दीड आणि तीन दिवसांच्या गणेश विसजर्नानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसजर्नास सुरूवात झाली आहे. पावसामुळे विसजर्नासाठी उशीर होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत 25 हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. एकीकडे पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे तर दुसरीकडे गौराईचे आगमन होत आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरात पावसाचा जोर मात्र वाढतच चालला आहे.
विसजर्नासाठी पालिकेने कृत्रिम तलाव व गणोशमूर्ती स्वीकार केंद्र तयार केले आहेत. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव, उपवन तलाव, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे व खारेगांव या ठिकाणी पालिकेने कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदीर, चिरंजीवी हॉस्पिटल, पोखरण रोड नं. 2 येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.16, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, 16 नं. पाईपलाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी गणोशमूर्ती स्वीकार केंद्र उभारले आहेत.
या सर्व ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच पोलिसांचाही चोख बंदोबस्त असून राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणोबरोबरच महापालिकेची यंत्रणादेखील सज्ज आहे. विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
बुधवारी मुंबईतील कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व कॉलेज- शाळांना बुधवारीदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणा केली आहे. मंगळवारीदेखील अर्ध्या दिवसानंतर कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण करुन दिली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. एनडीआरएफच्या 3 टीम मुंबईत तयार असून पुण्याहून आणखी 2 टीम रवाना झाल्या आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महपालिकेची कंट्रोल रूम सक्रिय असून, पाऊस / शहराशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी १९१६ ला कॉल करा असं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहनही केलं आहे. 'मुंबईतील सर्व पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अतिशय आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा', असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. 'मुंबईत गेल्या १ तासामध्ये ५२ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांमध्ये अधिक पाऊस अपेक्षित आहे', असंही त्यांनी सांगितलं आहे.