उल्हासनगर : शहरातील विविध ठिकाणच्या तब्बल ५ मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ९ जणांना अटक केली. यावेळी जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून चौकाचौकातील मटका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
उल्हासनगरात मटका जुगार, हुक्का पार्लर, ऑनलाईन लॉटरी जुगाराचे धंदे बंद करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी थेट विधानसभेत केली. मात्र त्यानंतरही ऑनलाईन लॉटरी, मटका जुगार, हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहेत.
याबाबत चर्चा शहरात सुरू झाल्यावर शुक्रवारी उल्हासनगर पोलिसांनी कॅम्प नं-१ येथील कृष्णा मार्केट व कॅम्प नं-२ येथील मच्छी मार्केट येथील मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून प्रकाश रमेश जाधव, किशन काळू सिंग, संस्कार आशिष सौदे, रवी ब्रह्मनंद मलेशा या चौघांना अटक करून गुन्हा दाखल केला. तसेच मध्यवर्ती पोलिसांनी फर्निचर मार्केट व शांतीनगर येथील मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून नरेश नरसिंग कोबी, हरेश घनश्याम पाहुजा, अजय साहेबराव केदार यांना अटक करून गुन्हा दाखल केला.
हिललाईन पोलिसांनी कॅम्प नं-५ येथील जय जनता कॉलनी येथील मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून हर्षवर्धन राहुल अरकर व हरेश भगवान नगराळे यांना करून गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे शहरातून कौतुक होत असून इतर मटका जुगार अड्डे, ऑनलाइन लॉटरी जुगार, हुक्का पार्लर यांच्यावरही कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.