ठाणे- ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या सरकत्या जिन्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सरकते जिने अचानक विरूद्ध दिशेने फिरायला लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेमध्ये पाच जणांना दुखापत झाली आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असणाऱ्या सरकत्या जिन्याचा पट्टा तुटला व अचानक जिने उलट्या दिशेने सुरू झाला. त्यावेळी जिन्यावर जास्त लोक असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक जिना थांबला. यामुळे जिन्यावर असलेल्या अनेकांचा तोल जाऊन ते पडले, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले. सुनील ठाकूर, तेजक्षी मिक्षा, कुलदीप वरे अशी तीन जखमींनी नावं असून इतर दोन जणांची नाव समजली नाही. जखमींवर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, प्रवाशांनी या घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. सरकत्या जिन्यांची योग्य देखभाल करण्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वीच हे सरकते जिने सुरू केले होते. लगेचच त्याचात बिघाड होतो. रेल्वे प्रशासन योग्य पावलं उचलण्यासाठी एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना बघण्याची वाट पाहतं आहे का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.