लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत ठेक्यावर असणाऱ्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कमी केल्या नंतर स्थानिकांवर बेरोजगारीची ओढवलेली संक्रांत दूर करण्यासाठी आमदार गीता जैन यांनी प्रयत्न चालवले होते . त्यातूनच ठेक्याच्या अनेक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळा तर्फे नोंदणी आदी कार्यवाही करून पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षक पुन्हा पालिका सेवेत दाखल झाले आहेत .
राज्य शासनाचे पूर्वी पासूनच आदेश होते कि , सुरक्षा रक्षक हे शासनाच्या मान्यता प्राप्त सुरक्षा मंडळाचे नेमण्यात यावेत . परंतु मीरा भाईंदर महापालिकेने असेच अनेक नगरसेवक व काही वादग्रस्त राजकारणी आदींनी अर्थपूर्ण हेतून सातत्याने शासन आदेशाचे उल्लंघन करत खाजगी ठेकेदारा मार्फत सुरक्षा रक्षक घेतले असे आरोप होत होते . प्रत्यक्षात कमी सुरक्षा रक्षक असणे , त्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन , भत्ते न मिळणे आदी अनेक कारणांनी आरोप होत होते .
तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाच्या मान्यतेचे असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेऊन काही राजकारणी यांना धक्का दिला . त्या नंतर आलेले आयुक्त संजय काटकर यांनी तर ठेकेदारालाच स्वतःहून काम बंद करण्यास भाग पाडले . कारण सदर ठेकेदार अनेक वर्षां पासून केवळ मुदतवाढीवर असल्याने तसेच विविध कारणांनी कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा होती .
पालिका सेवेत मे. सैनिक इंटेलिजन्स अँड सेक्युरिटी प्रा.लि. मार्फत असलेल्या ६४८ सुरक्षा रक्षकांना कंत्राट बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला . त्यात स्थानिक सुरक्षा रक्षक सुद्धा संख्येने नाईक होते . दरम्यान सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासह पुढील कार्यवाही बारगळली .
दुसरीकडे सुरक्षा रक्षकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता ठेकेदार व प्रशासनाने परस्पर सुरक्षा रक्षक कमी केल्याने अनेक स्थानिकांवर बेरोजगारीची पाळी आली . त्यांनी आमदार गीता भरत जैन यांच्याकडे नोकरी मिळावी म्हणून अर्ज केले . आ . जैन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा चालवला होता . पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक घेण्याची तयारी केल्याने स्थानिकांना संधी मिळणार नाही म्हणून त्यास आ . जैन यांनी विरोध केला .
अखेर स्थानिक सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळातर्फे नोंदणी करून लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेण्यात यावे ह्या मागणीवर उपमुख्यमंत्री व आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली . त्यामुळे आता स्थानिक बेरोजगार झालेल्या ५० सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळा तर्फे महापालिकेत पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे .
पुन्हा पालिका सेवेत रुजू झालेल्या सुरक्षा रक्षकांनी आ जैन यांची भेट घेऊन आभार मानले . महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन चे संयुक्त सरचिटणीस ऍड . अजिंक्य भोसले आदी उपस्थित होते . पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळाला असून आणखी १५० सुरक्षा रक्षकांना सुद्धा टप्या टप्याने पुन्हा सेवेत घेतले जाईल असे आ . जैन यांनी सांगितले .